स्पर्शाची भाषा प्राण्यांना अधिक भावते. या स्पर्शाप्रमाणेच श्वानांना आपल्या श्वान पालकांची सवय लागल्यावर त्यांच्यापासून दूर गेलेले अनेक श्वानांना सहन होत नाही. आपल्या पालकांवर हे श्वान मनापासून प्रेम करतात. पालकांच्या आज्ञेत राहण्याचा आनंद घेतात. या नि:स्वार्थ प्रेमाने श्वान पालकांचे देखील आपल्या श्वानांशी विलक्षण नाते जडते. अतिशय हळव्या स्वभावाचे वेमार्नर हे आपल्या पालकांशी एकनिष्ठ असणारे श्वान त्यापैकीच एक आहेत. वेमार्नर श्वानांचे मूळ जर्मनीत सापडते.

अठराव्या शतकात वेमार्नर श्वान जर्मनीमध्ये माहीत झाले. शिकारी, राखणदारी किंवा घरात विरंगळा म्हणून पाळण्यासाठी वेमार्नर श्वान जर्मनीत प्रसिद्ध होते. एकोणिसाव्या शतकात ब्रिटन, अमेरिकेतून या श्वानांचा जगभरात प्रसार झाला. यापूर्वी जगभरात हे श्वान प्रसिद्ध होऊ नये यासाठी जर्मनीतून हे श्वान इतर देशात पाठवण्यात येत नव्हते. काही वेळा जर्मनीबाहेर हे श्वान पाठवायचे असल्यास त्या ठिकाणी यांचे प्रजनन होऊ नये यासाठी श्वानांची शस्त्रक्रिया करून पाठवण्यात येत असे. भारतात अनेक वर्षांपासून या श्वानांचे वास्तव्य आढळते. युरोपियन नागरिक भारतात येताना वेमार्नर श्वानांना घेऊन आले. पारसी नागरिकांमध्ये वेमार्नर श्वान अधिक प्रमाणात आढळत होते. साधारण नर श्वानांची २८ इंच उंची असते आणि मादी श्वानांची २६ इंचापर्यंत उंची आढळते. निळा, राखाडी या आपल्या रंगामुळे वेमार्नर श्वान विशेष लोकप्रिय आहेत. साधारण गुलाबी रंगाचे नाक आणि तपकिरी रंगाचे डोळे यामुळे इतर श्वानांपेक्षा वेमार्नर श्वान वेगळे भासतात. वेमार्नर श्वानांच्या आकर्षक दिसण्यामुळे विविध डॉग शोजमध्ये देखील हे श्वान लोकप्रिय होतात. शरीरावर बारीक केसांचे आवरण असल्याने या श्वानांच्या पालनास फारसा अडथळा येत नाही. लांब केस असलेले वेमार्नर खूप कमी प्रमाणात आढळतात. डॉबरमन श्वान जातीप्रमाणे वेमार्नर श्वान दिसतात. मात्र तुलनेने डॉबरमन श्वानांपेक्षा वेमार्नर श्वान स्वभावाने शांत आहेत.

पोषक आहाराला व्यायामाची जोड

वेमार्नर श्वान हे शिकारी, राखणदारी अशा सगळ्या कामांसाठी पूर्वीपासूनच वापरण्यात आल्याने उत्कृष्ट ऊर्जा असलेले हे श्वान आहेत. या श्वानांची शारीरिक क्षमता उत्तम आहे. त्यामुळे या श्वानांचा आहार अतिशय पोषक आहे. साधारण अर्धा किलो बाजारात मिळणारे तयार अन्न, सातशे ग्रॅम मांसाहार आणि सोबतच उत्तम व्यायाम असे या श्वानांना दिल्यास श्वानांचे आरोग्य सुदृढ राहते. मैदानात धावणे, सायकलमागे पळायला लावणे यांसारख्या व्यायामाच्या कसरती या श्वानांना दिल्यास शारीरिक आणि मानसिक रित्या हे श्वान उत्तम राहतात. वेमार्नर श्वान सहसा आजारी पडत नाहीत. काही वेळेस त्वचा रोग होण्याचा संभव असतो. मात्र कोणत्या गोष्टीमुळे त्वचेला इजा पोहचते हे समजल्यास त्यानुसार त्वचेची काळजी घेता येते.

एकटेपणा नको

वेमार्नर श्वान अतिशय हळव्या स्वभावाचे आहेत. या श्वानांना एकटेपणा कदापि सहन होत नाही. वेमार्नर श्वानांना पाळल्यास या श्वानांसोबत सतत कोणीतरी राहावे लागते. या श्वानांना आपल्या श्वानपालकांची सवय झाल्यावर अचानक पालकापासून दूर करणे कठीण जाते. अचानक अशी कृती केल्यास या श्वानांना मानसिक त्रास होतो. या श्वानांच्या भावनांना समजून घेऊन अन्य श्वान पालकांकडे सुपूर्त करावे लागते. एखादा श्वान सोबती किंवा श्वानपालकाची गरज या श्वानांना कायम असते. एकटेपणा वाटल्यास या श्वानांचे मानसिक संतुलन बिघडून त्याचा त्रास श्वानांना होतो.