६० वर्षे विहीर दुर्लक्षित; श्रमदानातून गाळ उपसून पात्र स्वच्छ 

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेत बदलापूर गावातील शिवकालीन पुरातन नामशेष झालेली विहीर श्रमदानातून स्वच्छ करून पुन्हा वापरात आणली आहे.

बदलापूर गावातील रोहिदास वाडा आणि मुस्लीम मोहल्ला या भागात असलेली ही शिवकालीन विहीर पूर्णत: बुजली होती. या विहिरीत माती आणि विटांचा २५ ते ३० फूट गाळ साचलेला होता. त्यामुळे गेली ६० वर्षे ही विहीर दुर्लक्षित अवस्थेत होती. पंधरा चौरस फूट रुंद आणि तीस फूट खोल असणारी ही विहीर अक्षरश: नामशेष होण्याच्या मार्गावर होती. त्यात जलस्रोत असूनही गाळाने भरल्याने त्याचा वापर होत नव्हता. गावातील समर्थ सेवकांचे त्या विहिरीकडे लक्ष गेले. ऐतिहासिक खूण असलेल्या या दगडी विहिरीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इतर गावांतील श्री सदस्यांनीही या कामात हातभार लावला. या विहिरीतील गाळ आणि विटांचे तुकडे श्रमदानातून काढण्याचे काम त्यांनी सुरू केले. तब्बल ३२ तास अथक परिश्रम घेत त्यांनी तीस फूट खोल असणारी विहीर स्वछ केली. या विहिरीतील सुमारे दहा टनांपेक्षा अधिक विटा आणि माती बाहेर काढण्यात आली. त्यामुळे आता या विहिरीतील नैसर्गिक झरे मोकळे झाले आहेत.

याआधी पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करून ते वृक्ष जगवण्याचा उपक्रम श्री सदस्यांनी हाती घेतला आहे. वृक्ष वाढवण्याबरोबरच पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने परिसरातील विहिरींची आम्ही पाहणी केली. त्यात ज्या अशा नामशेष व्हायला आलेल्या विहिरी आहेत, त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले. या परिसरातील अन्य विहिरीसुद्धा स्वच्छ करण्यात येणार आहेत, जेणेकरून भूगर्भातील जलसाठा वाढीस लागेल, असेही सदस्यांनी या वेळी सांगितले. या विहिरीची स्वच्छता झाल्याने आता आसपासच्या नागरिकांना या विहिरीचे पाणी वापरता येणार आहे. तसेच आसपासच्या कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासही मदत होणार आहे.