कल्याण : महापालिका हद्दीतील वाढत्या करोना रुग्णांना तत्पर वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून महापालिका प्रशासनाने डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात मंगळवारपासून १८५ खाटांचे सुसज्ज समर्पित करोना आरोग्य केंद्र सुरू केले आहे.

या केंद्रात कृत्रिम श्वसन यंत्रणा, बायपॅप, रुग्णांसाठी मनोरंजन म्हणून संगीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहर अभियंता सपना कोळी यांनी सोमवारी या प्रकल्पाची पाहणी केली. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या अखत्यारीत हे केंद्र चालविले जाणार आहे. महापालिका हद्दीतील वाढत्या रुग्णांना तात्काळ स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळतील या दृष्टीने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी हे नियोजन केले आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता झाली आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेच्या आणि पालिका नियंत्रित करोना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करून ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली.

सुविधा काय?

’ बंदिस्त क्रीडागृहात १५५ खाटांना प्राणवायूची सुविधा उपलब्ध आहे. ३० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे.

’ क्रीडागृहात सतत थंडावा राहावा म्हणून पंख्यांबरोबर वातानुकूलित यंत्रणा (कम्फर्ट कूलिंग) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

’ रुग्णांचा मानसिक तणाव कमी व्हावा म्हणून मंद आवाजातील गाणी ऐकण्याची सुविधा येथे आहे.

’ जीवनसंदेश देणारी भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत.

’ १४ हजार चौरस फूट जागेत ही सुसज्ज यंत्रणा अल्पावधीत उभारण्यात आली आहे.

विविध ठिकाणी खाटा उपलब्ध

डोंबिवलीतील इंदिरानगरमधील झोपू योजनेतील खोल्यांमध्ये २०० खोल्या, कल्याणमधील टेनिस कोर्टात ७५ खाटा, जिमखाना येथे ११० खाटा, फडके मैदानाजवळील कलादालनात ४०० खाटा, याच ठिकाणी १२० अतिदक्षता विभाग, वसंत व्हॅली येथे ७५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व सुविधांमध्ये कृत्रिम श्वसनयंत्रणा, अतिदक्षता विभाग असणार आहेत. रुग्ण राहत असलेल्या भागातच रुग्णाला वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत यावर प्रशासनाचा भर आहे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.