News Flash

भूतकाळाचे वर्तमान : आठवणीतील विहिरी!

पूर्वी उन्हाळी सुटी म्हटली की विहिरींमध्ये मनसोक्त पोहायचं. उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय वाटायचा.

| April 25, 2015 12:22 pm

tvlogपूर्वी उन्हाळी सुटी म्हटली की विहिरींमध्ये मनसोक्त पोहायचं. उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय वाटायचा. ठाण्यातील अनेक विहिरींवर पूर्वी लहान मुले पोहत असल्याचे चित्र दिसत असे. आता मात्र या विहिरींकडे कुणाचेच लक्ष नाही. काही ठिकाणी तर विकासकामांसाठी विहिरी बुजवल्या जात आहेत. या विहिरी आता केवळ आठवणींपुरत्याच राहिल्या आहेत.

मला आठवतंय वार्षिक परीक्षा संपता संपता वेध लागायचे ते उन्हाळी सुट्टीचे. सर्व बाळगोपाळांचा दोन कलमीच कार्यक्रम असायचा- एक तर गावी जायचे किंवा इथेच राहून विटीदांडू, लगोऱ्या, गोटय़ा किंवा एखाद्या डेरेदार पसरट झाडावर सूरपारंब्या खेळायचे, याच झाडांना झोपाळे बांधून मुले-मुली उंचच उंच झोकेही घ्यायचे. आमच्यातील बऱ्याचपैकी जाणती मुले उन्हाच्या काहिलीवर रामबाण उपाय म्हणून तलाव-विहिरींचा तळ धुंडाळत पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत. त्या वेळी क्लासेस फोफावली नव्हती. मुलांना सतत बांधून ठेवणारी विशेष उन्हाळी शिबिरे, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, नृत्य वर्ग, गिर्यारोहण वगैरे प्रकार नव्हते. एखाद्या निवृत्त शिक्षकाच्या घरी खासगी शिकवणी असायची, पण तीही सुट्टीत बंद असायची, त्यामुळे आम्हाला रान मोकळे असायचे.
माझे बालपण कोलबाड, खोपट येथे गेले. उथळेश्वर मंदिरात बिगारी (आताची बालवाडी) व पुढे जवळच असलेल्या वॉकरवाडीतील इनामदारांच्या दुमजली माडीत सातवीपर्यंत शाळा भरायची. आताची ठाणे महानगरपालिकेची सातवीनंतरची शाळा ती हीच. वॉकरवाडीत भाजीचे मळे फुलायचे, विहिरीला बैलाची मोट होती. या मोटेचे पाणी बाजूच्या चौकोनी टाकीत जमले, की पाटाने हव्या त्या मळ्यात पाणी सोडले जाई. वॉकरवाडीबरोबर गोपाळबाग, गावंडबाग, कोलुगडय़ांची बाग त्या वेळी प्रसिद्ध होती. आंबे, पेरू आणि उन्हाळ्यात भाजीचा मळाही फुलवला जाई. कोलुंगडे यांच्या बागेतील विहिरीवर पोहऱ्यांची (डब्यांची) मोठी माळ असलेली रहाट होती. ती रहाट बैल फिरवायचे. उभा छेद घेऊन अर्धगोलाकार कोरलेल्या ताड वृक्षाच्या पन्हाळीत चक्राकार रहाटाने पाण्याने भरून वर आलेले डबे खाली जाताना या पन्हाळीत रिकामे व्हायचे आणि पन्हाळीतून आलेले पाणी बाजूच्या चौकोनी टाकीत भरले जायचे. त्यापूर्वी टाकीच्या तळाशी असलेल्या गोलाकार छिद्रात लाकडी खुंटी टाकून बाहेर जाणारे पाणी रोखले जायचे. टाकी भरली की, आम्ही मुले त्या पाण्यात मनसोक्त डुबतानाच पोहायला शिकायचो.
कोलबाडमध्ये जागमाता किंवा शंकर मंदिराच्या बाजूला सार्वजनिक विहीर होती. आता ती विहीर स्लॅब टाकून बंद करण्यात आली आहे, पण तेव्हा या विहिरीत पोहण्यासाठी लहानमोठय़ा मुलांची झुंबड उडायची. नवशिक्या मुलांच्या पाठीला हवाबंद डालडाचे डबे बांधून त्यांना विहिरीत सोडत. पाण्याची भीती संपली की, काही मिनिटांतच हातपाय मारून तो पोहायला शिके. मग दोन-तीन दिवसांतच डब्याशिवाय तो पोहू लागे. त्या काळात उथळसर, कोलबाड, खोपट, नाशेळी पाडा, गोकुळदास वाडी ते पोखरण तलावापर्यंतच्या अनेक विहिरींमध्ये मी पोहलो आहे. ठाण्यातील तलाव-विहिरींशी असे घट्ट नाते लहानपणापासूनच जडले होते. ठाण्यातील काही विहिरी किमान शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात, काही तर त्याहूनही प्राचीन असाव्यात, कारण १६व्या शतकात पोर्तुगीजांनी आरंभीलेल्या धर्मछळाच्या भीतीने एतद्देशीय लोकांनी आपल्या अनेक देवादिकांच्या मूर्तीना विहिरीचा तळ दाखविला आहे. गाळ उपसताना कधी तरी या मूर्ती प्रकट होतात. मूर्तीचा इतिहास शोधताना विहिरीचा कालखंड आपोआप समोर येतो. ४० वर्षांपूर्वी गोल्डन डाइज कंपनीच्या आवारातील विहिरीचा गाळ साफ करताना ब्रह्मदेव आणि इतर काही भंग झालेल्या मूर्ती सापडल्या होत्या. अलीकडेच याच आवारात सदाशिवाची मूर्ती सापडली. त्यासोबत मंदिराचे काही अवशेषही सापडले. वेळीच त्याची दखल घेतल्यामुळे आज कापूरबावडीच्या कलादालनात ती सुरक्षित आहे. वर्तकनगरच्या जानकादेवी मंदिराच्या जागेवरच पोर्तुगीजांनी ‘अवर लेडी मर्सी’ हे चर्च व गढी बांधली. कालांतराने ही जागा ओस पडून तेथे जंगल माजले. ६५ वर्षांपूर्वी तिथल्या विहिरीत सापडलेल्या मूर्तीची पक्षांच्या स्वामी रामदास बाबा यांनी यथासांग पूजाअर्चा सुरू केली, हीच ती वर्तकनगर आणि माजीवाडा गावांची कुलस्वामिनी जानकादेवी होय.
एके काळी साठ तलाव आणि मंदिरांसाठी ठाणे शहर प्रसिद्ध होते. या तलावांबरोबरच घरोघरी विहिरी होत्या. अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार असाव्यात. त्यांचा इतिहासही अभ्यास करण्यासारखा आहे, पण काळाच्या ओघात अनेक विहिरी नामशेष झाल्या आहेत. तरीही आजघडीला कोपरी प्रभाग समिती ३५, नौपाडा प्रभाग ६३, उथळसर प्रभाग १८, कळवा प्रभाग २९, मुंब्रा प्रभाग ३८, वागळे इस्टेट प्रभाग १६, रायलादेवी प्रभाग ३७, वर्तकनगर प्रभाग २९ आणि मानपाडा प्रभागात ५५ व वापरात नसलेल्या १०८ अशा एकूण ४२८ विहिरींची अधिकृत नोंद सरकारदरबारी आहे. यामध्ये गोलाकार, चौकोनी व अर्धवर्तुळाकार विहिरींचा समावेश आहे. त्यापैकी चौकोनी विहिरी ३९ आहेत. अर्धवर्तुळाकार १ व उर्वरित गोलाकार आहेत. ठाण्यातील सुप्रसिद्ध सात रहाट असलेली मोठी चौकोनी विहीर शिवसेनेच्या सूर्या कार्यालयासमोर होती. ती अलीकडेच बुजवून त्यावर दुकाने उभी राहिली आहेत. ठाणे शहरातील सर्वाधिक चौकोनी विहिरी या चऱ्हई टेंभीनाका भागात होत्या. त्यापैकी अहिल्यादेवी उद्यानाच्या बाजूच्या चौकोनी विहिरीवर आता कारंजे बसविले आहे. कोंडसकर अपार्टमेंट, चंद्रलोक सोसायटी आणि पुष्कराज सोसायटी येथील विहिरी अद्याप तग धरून आहेत.
कोपरी भागात सर्वात मोठय़ा म्हणजे ४०-४५ फूट व्यासाच्या विहिरी आहेत. ५०-६० च्या दशकात कंपन्यांनी बांधलेल्या विहिरी अशाच मोठय़ा आहेत. रेमंड वूलन मिल, मॉडेला वूलन मिल, किरण मिल, कॅशल मिल इत्यादी कंपन्यांतील विहिरी मोठय़ा असण्याचे कारण म्हणजे त्यांचा मोठा पसारा, झाडे, बगिचे, स्वच्छतागृह आणि त्यांनी उभारलेल्या कामगार वसाहतीसाठी या विहिरींचा पाणीपुरवठा वर्षभर चालत असे.
७०-८० वर्षांपूर्वी ठाण्यातील वाडे, घरे, चाळी या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. सुंदर नीटनेटक्या घरांच्या आवारात अथवा परसदारात खासगी विहिरी होत्या, त्यात नारळवाली चाळ, नाईकवाडी, केतकर वाडा, वॉकरवाडी, दामले वाडा, टिळक वाडा, जोशीवाडा, देशमुख वाडा, रणदिवे वाडा, आपटे वाडा, साठे वाडा, मेहेंदळे वाडा, पाठक वाडा, सुगंधी वाडा, फडके वाडा, भागवत बंगला, दातार सदन, भिसेवाडा, डहाकेवाडी, दादापाटील वाडी, ठाणेकर वाडी, शकुंतला कोठरे चाळ, ठाणावाला चाळ, काजरी चाळ, तावडे चाळ, भोईरवाडी, कबीरवाडी अशा खासगी विहिरींबरोबरच सार्वजनिक विहिरीही होत्या. ठाण्यात नळाचे पाणी सुरू झाले आणि हळूहळू विहिरीचे पाणी पिणे लोकांनी सोडून दिले.
विहिरींचा उपयोग कपडे, भांडी धुणे व इतर कामांसाठी होऊ लागला. विहिरी बुजवल्या जाऊन त्यावर स्लॅब टाकून त्यावर इमले चढले आहेत. मळा फुलवणारी जीवनदायी विहीर भविष्यात टिकणार आहे की नव्या स्वरूपात ती प्रकटणार आहे, हे येणारा काळच ठरवेल.
सदाशिव टेटविलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2015 12:22 pm

Web Title: well in thane to remember
टॅग : Well
Next Stories
1 मुशाफिरी : जिद्द आकाश कवेत घेण्याची
2 तिरका डोळा : सुटी म्हणजे पिंजऱ्यात बदल
3 तक्रारी वाढल्या.. तरीही फेरीवाले कायम!
Just Now!
X