20 February 2019

News Flash

रेल्वे चौपदरीकरणाची संथगती

डहाणू रोड ते विरार या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम प्रशासकीय दुर्लक्षामुळे रखडले आहे

विरार ते डहाणू रोड रेल्वेमार्ग दुपदरी असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प रखडला; भूसंपादनाचे काम अद्याप पूर्ण नाही

पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड ते विरार या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम प्रशासकीय दुर्लक्षामुळे रखडले आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी चौपदरीकरण करण्यात येणार आहे. मात्र अद्याप भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले नसल्याचे चित्र आहे.

डहाणू रोड ते विरार या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर लाखो कर्मचारी प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी गाडय़ांची आणि फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गाडय़ांची संख्या वाढवण्यात ट्रॅक कॅपॅसिटीची मर्यादा येत आहे. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. मात्र हे काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑगस्ट २०१७मध्ये तयार करण्यात आले होते. डिसेंबर २०१८पर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघरमधील एका रेल्वे प्रवाशाने माहितीच्या अधिकारातून ‘एमयूटीपी-३’ प्रकल्पांतर्गत होणाऱ्या या कामाची माहिती विचारल्यानंतर या कामाच्या रखडपट्टीचे चित्र पुढे आले आहे. या प्रकल्पासाठी डिसेंबर २०१८मध्ये भूसंपादन पूर्ण झाल्यास मार्च २०२३पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेने कळवले आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता भूसंपादनाचे काम पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची चिन्हे आहेत. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यास जमिनीचा भराव आणि पुलाच्या कामांसाठी निविदा काढण्याचे आणि त्यानंतर रूळ टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मात्र भूसंपादनालाच विलंब लागणार असल्याने त्याचा परिणाम अन्य कामांवर होणार आहे.

वैतरणा नदीवर सध्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अंतर्गत पुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असताना चौपदरीकरणाच्या मार्गावरील अनेक पूल आणि मोऱ्यांची उभारणी तीन वर्षांत कशी पूर्ण होईल याबाबत रेल्वे प्रवासी साशंक आहेत. यामुळे रुळांच्या क्षमतेची मर्यादा असल्याची सबब पुढे करून नव्या उपनगरी सेवा सुरू होण्याची शक्यता धुरकट आहे.

‘प्रस्तावामध्ये त्रुटी’

विरार-डहाणू चौपदरीकरण करण्यासाठी रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे पालघरच्या जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. या त्रुटी रेल्वेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वेकडून अपेक्षित     डहाणू-विरार चौपदरीकरणाचे काम रेंगाळले असताना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मात्र जिल्हा प्रशासन तळमळीने काम करताना दिसून येत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये येणाऱ्या ८५ गावांमध्ये जिल्हा प्रशासन  महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पातील बाधितांना शासनाच्या योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असताना दैनंदिन रेल्वे प्रवाशांचे कमी गाडय़ांच्या उपलब्धतेमुळे होणारे हाल, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना नव्याने थांबे मिळण्यास रेल्वे प्रशासनाकडून होणारी दिरंगाई याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

विरार-डहाणू पट्टय़ात दैनंदिन प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने रेल्वेचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकल्पाची प्रगती पाहता तो २०२३पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. एकीकडे बुलेट ट्रेनचा प्रकल्प वेगाने पुढे सरकत असताना चौपदरीकरणाचा हा प्रकल्प कासवगतीने पुढे सरकताना दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

– हितेश सावे, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

विरार— डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जागेचे सर्वेक्षण नोव्हेंबर अखेरीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर खासगी जागेची खरेदी करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी लवकरात लवकर भूमोजणी पूर्ण होईल. यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

-डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर

 

 

First Published on October 12, 2018 3:29 am

Web Title: western railway ignore four lane work from dahanu road to virar