निगरगट्ट प्रशासनाविरोधात प्रवाशांचा संताप

विरार रेल्वे स्थानकात स्ट्रेचर उपलब्ध झाल्याने एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकात प्रमुख सुविधा नसल्याने रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

विरारहून ७.११ ची डहाणू उपनगरी गाडी पकडून स्वप्नील किणी हा  तरुण सफाळ्याला जात होता. प्रवासादरम्यान अचानक तो विरार ते वैतरणा स्थानकादरम्यान तो गाडीतून पडल. डब्यातील प्रवाशांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी गाडीची साखळी खेचून ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी पुढे वैतरणा स्थानकावर जाऊन थांबली. त्यानंतर डब्यातील प्रवाशांनी रूळांवरून चालत जाऊन जखमीला विरार स्थानकात आणले. मात्र स्थानकात स्ट्रेचर उपलब्ध नव्हते.  प्रवाशांकडून वारंवार मागणी करून देखील या जखमी प्रवाशाला स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे स्ट्रेचरअभावी जखमी स्वप्नील जवळपास अर्धा ते पाऊण तास रेल्वे स्थानकात विव्हळत पडल्याची माहिती घोलवड डहाणू प्रवाशी संघटनेचे उपाध्यक्ष सतीश गावड यांनी दिली. त्यांनतर रुग्णवाहिकेने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वप्नील किणी या प्रवाशाला विरार रेल्वे स्थानकात जर वेळेत स्ट्रेचर उपलब्ध झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.स्वप्नील किणी याच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात एक निवेदन त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे. अनेकदा विरार-डहाणू पट्टय़ात उपनगरी गाडीतून एखादा प्रवासी पडल्यास साखळी ओढल्यानंतर गाडी थांबवली जात नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.