आयुक्तांच्या आक्षेपार्ह संदेशावर नगरसेवकांची नाराजी; पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ठरावीक अधिकाऱ्यांवर अत्यंत शेलक्या शब्दात केलेल्या टीकेचे पडसाद गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. या वृत्ताला महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी दुजोरा दिल्यानंतर सर्वपक्षीय महिला नगरसेविका आक्रमक झाल्या आणि त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून सभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब केले. मात्र, सभा सुरू झाल्यानंतरही पुन्हा याच विषयावरून सभागृहात वातावरण तापले.

ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला डावलून केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २४ तासात मागे घेण्याची नामुष्की ओढविल्यामुळे संतप्त झालेले आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वॉटस् अ‍ॅप ग्रुपवर अत्यंत शेलक्या शब्दात ठरावीक अधिकाऱ्यांचा उद्धार केला होता. त्याचे छायाचित्र (स्क्रिन शॉट) सर्वत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असतानाच, हा मुद्द गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी उपस्थित केला. ‘त्या’ संदेशामध्ये नेमके काय म्हटले आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. त्यापाठोपाठ भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनीही याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी सभागृहात केली. तर याविषयी अधिकारी गप्प का आहेत, असा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी मांडला. मात्र, याबाबत एकही अधिकारी बोलण्यात तयार नव्हता. अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. त्यावेळेस ‘सभागृहाचे संरक्षण असेल तर सर्व माहिती सांगेन’ अशी भूमिका बुरपुल्ले यांनी मांडली. त्यास नगरसेवकांनी होकार देताच महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर अशा प्रकारची चर्चा झाली असून ही वस्तुस्थिती असल्याचे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. मात्र हा संदेश कुणी टाकला होता, हे त्यांनी सांगणे टाळले. तसेच आई-बहिणींविषयी वादग्रस्त विधान केल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे सर्वपक्षीय महिला नगरसेविका आक्रमक झाल्या आणि त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. अखेर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकाराच्या निषेधार्थ अर्धा तास सभेचे कामकाज तहकूब केले. तसेच राजकीय नेत्यांबद्दलही अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर गुन्हा दाखल करेन..

तहकूब सभेचे कामकाज अर्धा तासानंतर सुरू झाले. त्यावेळेस शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी हा मुद्द पुन्हा उपस्थित केला. वादग्रस्त संदेशानंतरही अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर इतर अधिकाऱ्यांचे माहीत नाही, पण हा मला माझ्या आईचा अपमान वाटतो. ती ८० वर्षांची असून तिला गावावरून बोलावून घेतले आहे. तसेच याबाबत वकिलांशी चर्चा करून गुन्हा दाखल करेन, असे पालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. मात्र, नेमका कुणावर गुन्हा दाखल करणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.