सरवली विसर्जन घाटावर दूषित पाण्यासोबत कचऱ्याचे साम्राज्य

बोईसर येथील गोदामे, भंगारवाल्यांकडून दूषित पाणी, कुंभावली येथे सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाणी यामुळे सरावली येथील खाडीतील पाण्याने रंगीत पाणी निर्माण झाले आहे. त्यात कचऱ्याचे साम्राज्यही आहे. यामुळे गणरायांचे विसर्जन यंदा करायचे कुठे, हा प्रश्न पडला आहे.

सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या येथील खाडीजवळ काही वर्षांपूर्वी विसर्जन घाट तयार करण्यात आला होता. कंपन्यांचे सांडपाणी व नागरी संकुलातील गटाराच्या पाण्याने खाडीला गटाराचे स्वरूप आले होते. पावसाळ्यात घाण वाहून जात असल्याने थोडय़ा प्रमाणात तेथे चांगले पाणी येते. परंतु सरावली ग्रामपंचायतीकडे त्यांच्या गावाच्या हद्दीत निर्मित घनकचऱ्याची विल्हेवाट करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने हा घनकचरा येथील नाल्यालगत असलेल्या जागेवर टाकला जातो. संपूर्ण खाडीचा भाग कचऱ्याने व्यापून गेला आहे.

ग्रामपंचायतीने दोन दिवसांपूर्वी विसर्जन घाट परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले असून कचरा वेचणाऱ्या महिलांकडून हे काम केले जात आहे. सरावली विसर्जन घाटाच्या सफाईचे काम झाले असले तरी आजूबाजूला आणि खाडीच्या पात्रातील पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घनकचरा तसाच आहे. या विसर्जन घाटावर सरावली, पंचाळी, उमरोळी येथील गणपती विसर्जनाला येतात, परंतु यंदा बकाल झालेल्या विसर्जन घाटामुळे नागरिकांना विसर्जनामध्ये कचऱ्याचे विघ्न समोर आले आहे. प्रदूषित खाडीच्या पाण्यामुळे येथे गणपती विसर्जन करताना त्वचेच्या आजाराची समस्या भेडसावणार असल्याने घाट स्वच्छ असावा अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे ग्रामपंचायतदेखील खाडी प्रदूषित करीत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

गणपतीसाठी विसर्जन घाट स्वच्छ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडे जागा नसल्याने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. नाल्यात कोणत्याही प्रकारे कचरा टाकला जात नाही.

– सुभाष किणी, ग्रामसेवक सरावली.