28 February 2021

News Flash

मुद्रण व्यवसायाला घरघर

करोनाच्या संकटाने या व्यवसायात नवा अडसर निर्माण केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सागर नरेकर

समाजमाध्यमांच्या वाढीमुळे मुद्रित प्रकारातील उत्पादनांना मोठा फटका बसला असताना गेल्या वर्षभरापासून करोनाच्या संकटामुळे मुद्रण व्यवसायाला घरघर लागली आहे. पहिल्या टाळेबंदीतून सावरत असतानाच दुसऱ्या टाळेबंदीच्या शक्यतांनी निम्म्यावर आलेल्या व्यवसायाला ३० टक्क्यांवर नेऊन पोहोचवला आहे, अशी व्यथा उल्हासनगर शहरातील मुद्रण व्यवसायिकांनी मांडली.

लग्न पत्रिका, लहान मोठी दैनिके, नियतकालिके, बिल पुस्तक, प्रचार साहित्य, कार्यालयीन साहित्य, शालेय साहित्य, पुस्तके छपाई करण्यासाठी जिल्ह्य़ात उल्हासनगर सर्वात मोठी मुद्रण बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. रेल्वे मार्गाने जोडलेल्या कर्जतपासून ते कसारा, आसनगाव, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड ते रायगड जिल्ह्य़ांतल्या खोपोलीतून ग्राहक उल्हासनगर शहरात छपाईसाठी येत असतात. लग्नाचा हंगाम या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र वार्षिक २५० ते ३०० कोटींची उलाढाल असलेल्या या व्यवसायाला गेल्या काही वर्षांत घरघर लागली आहे. त्यातच करोनाच्या संकटाने या व्यवसायात नवा अडसर निर्माण केला आहे.

छापील उत्पादनांचा वापर करोना काळात एकदमच थंडावला. त्याचा थेट परिणाम मुद्रण व्यवसायावर झाला. लग्न पत्रिकांच्या छपाईची मागणी थेट ५० टक्क्यांवर आल्याचे गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसाय असलेले दुर्गा प्रिंटर्सचे केतन मोटवाणी सांगतात. आमच्याकडे जिल्ह्य़ातले विविध साप्ताहिके, दैनिक वृत्तपत्रे, मासिके छापायला येत होती. मात्र सध्या डिजिटल प्रकारातून व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून वृत्तपत्रे प्रसारित करण्यावर भर दिला जात असल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच वृत्तपत्रे छापली जात आहेत. लग्न पत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, प्रचार साहित्य यांचीही मागणी कमी झाल्याचे या मोटवाणी सांगतात. मोटवाणी यांच्याकडे ऑफसेट आणि स्क्रिन अशा दोन्ही प्रकारची छपाई केली जाते. ऑक्टोबरमध्ये टाळेबंदीत शिथिलता आल्याने काही अंशी व्यवसाय वाढला होता. मात्र त्यात पुन्हा घट होऊ लागली आहे.

वाहतूक व्यवस्थेचाही फटका

मुंबई आणि इतर उपनगरांतील ग्राहक उपनगरीय रेल्वेने उल्हासनगर शहराशी थेट जोडले गेले होते. मात्र सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी बंद असलेला प्रवास आणि आता मर्यादित वेळेतल्या प्रवास मुभेमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे उल्हासनगर प्रेस ऑनर असोसिएशनचे अध्यक्ष नरेश दुर्गानी यांनी सांगितले. शहरात १५० लहान छपाईची दुकाने तर पॅकेजिंग आणि मोठी छपाईच्या सात ते आठ आस्थापने शहरात आहेत. त्या सर्वावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गालाही मोठा फटका बसला आहे. अनेक कामगार कमी करावे लागले, असेही दुर्गानी यांनी सांगितले आहे.

टाळेबंदीच्या भीतीने घट

गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुन्हा टाळेबंदीचे संकट घोंगावते आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात करण्यात आलेली लग्न पत्रिका, प्रचार साहित्याची मागणी ग्राहकांनी निम्म्यावर करण्यास सांगितली आहे. त्यामुळे आता कुठे उभारी घेऊ लागलेल्या व्यवसायाला पुन्हा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.

कच्चा माल महागला

कागद, छपाईचे रंग आणि साचे बनवण्याचा कच्चा माल महागल्याने छपाईच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र करोनाच्या काळात व्यवसाय टिकवण्यासाठी ग्राहकांवर खर्चाचा भार टाकल्यास नुकसान होण्याची भीती असल्याने नफा कमी करत व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे अनेक मुद्रक सांगतात. छपाई साहित्याची सजावट आणि रचनाकार यांच्या व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:18 am

Web Title: whew to the printing business abn 97
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात टीम ओमीचे शक्तिप्रदर्शन
2 पापडखिंड धरणातून पाणी बंद
3 नागरिकांच्या संतापापुढे अधिकाऱ्यांचे नमते
Just Now!
X