भी माशंकराच्या अरण्याला श्रावणामुळे जत्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या रांगा मंदिर परिसरातून काही केल्या पुढे सरकत नव्हत्या. भगवे झेंडे, रुमाल वा कपडे ल्यालेल्या शिवभक्तांचा गजबजाट होता. या सगळयापासून थोडय़ाच अंतरावर गुप्त भीमाशंकराच्या पुढे खालच्या जंगलात आम्ही काही दोस्त एका कातळावर पहुडले होतो. दोन शाळकरी मुले बराच वेळ आमचं निरीक्षण करत होती. बाजूच्या वाडीतील असावीत. गेल्या अध्र्या तासापासून समोरच्या झाडावर ‘टर्रर’ ओरडणारं शेकरू अचानक गुडूप झालं.
‘काय झालं रे? शेकरू कुठे पळालं?’ आमच्यातल्या एकाच्या प्रश्नासोबतच एक मोठा कृष्ण गरुड त्या झाडाच्या मागून समोर आला. पिवळी चोच, पिवळे पाय आणि काळंभोर दणकट शरीर. आम्ही लगेच दुर्बीण सरसावून निरीक्षण करूलागलो. सुमारे तीन-चार मिनिटे त्या झाडापाशी घोंगावून तो गरुड लांब गेला.
त्या वाडीवरल्या पोरांपैकी एकाने आता जवळ येऊन दुर्बीण मागितली. नक्की यातून लांबचं जवळ दिसतं याविषयी त्याचं समाधान झाल्यावर तो म्हणाला, ‘‘पुढे येता का दुर्बीण घेऊन, एका निल्या पक्ष्याचा घरटा हाय.’ एकही प्रश्न न विचारता पुढच्याच मिनिटाला आम्ही शिवशंभोने धाडलेल्या मुलांच्या मागे चालू लागलो. काही अंतरावर थोडय़ा गर्द झाडीत एका मोठय़ा झाडाच्या ढोलीकडे बोट दाखवून म्हणाला की या ढोलीत घरटं आहे. कोणता पक्षी असेल, काय यासंबंधी कोणतेही डोके चालवण्याच्या आधीच एक गर्द निळा नाचऱ्याच्या जातकुळीतील पक्षी तोंडात अळी घेऊन ढोलीत गडप झाला. आम्हीही स्थिरावलो.
‘व्हाइट बेलीड ब्ल्यू फ्लायकॅचर’ म्हणजेच पांढरपोटय़ा नर्तक. हा आपल्या सह्य़ाद्रीच्या कुशीत राहणारा स्थायिक पक्षी. पश्चिम घाटाव्यतिरिक्त इतरत्र अख्ख्या जगात कुठेही न सापडणारा पक्षी. सह्य़ाद्रीच्या कुशीत असे १० जातीचे पक्षी आहेत. त्यातील हा एक. पावसाळा हा त्याचा विणीचा हंगाम. हा ढोलीतून बाहेर पडताच, याचा जोडीदार गांडूळ घेऊन आत गेला. बराच वेळ त्यांची लगबग न्याहाळून झाल्यावर, आम्ही लांबवर एका मोठय़ा खडकावर जाऊन बसलो आणि त्या मुलांसोबत बिस्किट, चिवडा खात खात एंडॅमिक पक्ष्यांविषयी बोलू लागलो.
पांढरपोटय़ा नर्तक हा आकाराने चिमणीएवढाच, निळाशार रंग, फक्त नावाप्रमाणेच पोट पांढरे. चोच आणि डोळ्याजवळचा भाग काळा असा नटलेला नर, तर मादी तपकिरी रंगाची, गळा-छाती नारंगी, तर शेपटी तांबूस व डोके राखी रंगाचे.
सह्य़ाद्रीच्या घनदाट जंगलात वास्तव्य. इतर पक्ष्यांप्रमाणे हे पक्षी फांदीवर घरटं करत नाहीत किंवा सरळ झाडाच्या ढोलीतही अंडी घालत नाहीत. हे पक्षी झाडाच्या ढोलीत किंवा जंगलातील शेवाळलेल्या दगडी कपारीत स्वत:चे वाटीच्या आकाराचे घरटे बनवितात आणि त्यात हिरवट तपकिरी ठिपके असलेली सुमारे १.५ ते २ सेमी आकारची चार अंडी घालतात. पिलांचे संगोपन नर-मादी दोघेही करतात. शत्रू दिसल्यास ट्स्कऽऽ ट्स्कऽऽ ट्स्कऽऽ असा आवाज काढतात.
साधारणत: जंगलातील छोटय़ा ओढय़ाजवळ अथवा मोठय़ा वृक्षांच्या मध्ये वाढलेल्या झुडपात किडे पकडत हिंडताना हे पक्षी दिसतात.
शास्त्रीय भाषेत याला ‘कार्यानीस पॅलोपेस’ असे म्हणतात. यातील कार्यानीस हा शब्द कुआनोस आणि ऑर्निस या दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. कुआनोस म्हणजे गडद निळा आणि ऑर्निस म्हणजे पक्षी. पॅलीपेस हा शब्द पॅलिडुसी आणि पेस या दोन लॅटिन शब्दांमधून आला आहे. पॅलिडुसी म्हणजे फिकट रंग आणि पेस म्हणजे पाय. हेच या पक्ष्याचे अचूक वर्णन आहे.