कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्ड्यांनी पाच जणांचा जीव घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी शहर अभियंत्यांना प्रसारमाध्यमांसमोरच खडे बोल सुनावले. ‘खड्डे भरणं तुमचं काम आहे. जरा रस्त्यांवर फिरत जा. कुठे किती खड्डे आहेत जरा बघा’ अशाप्रकारच्या सुचना शिंदे यांनी केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या व्हिडीओत दिसत आहे. पण शिंदे साहेबांना (साहेब त्यांचे कार्यकर्ते म्हणतात त्यांना) लुईसवाडीतील नागरिक हाच सल्ला देत असतील. ‘जरा रस्त्यांवर फिरत जा. कुठे किती खड्डे आहेत जरा बघा’

वर जो हा रस्त्याची चाळण झालेला फोटो दिसत आहे तो रस्ता आहे एकनाथ शिंदेच्या घरापासून अवघ्या २०० मीटरवर. हो आता शिंदेंचं या रस्त्यावर येणं जाणं होत नाही कारण हायवेला तयार केलेल्या एक्झिटमधून ते घराकडे जातात. त्यामुळे त्यांना या रस्त्याच्या दुर्वास्थेची कल्पना नसणार. एक माणूस काय काय बघणार नाही का? असो.. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांच दूर्लक्ष झाल्याने परिस्थिती बदलत नाही. पण यामागेही काही विचार असतील त्यांचे. म्हणजे कसं की कल्याण डोंबिवलीतले खड्डे पहावे लागले कारण तिकडे पाच मेलेत. इथले घरा जवळचे छोटे छोटे खड्डे कशाला पहायचे नाही का? अरे इथं अजून एकजण जखमीही झाला नाही साधा मग अशा खड्ड्यांना का किंमत द्यायची. एखादा अपघात झाला जीव गेला की लक्ष जाईल सगळ्यांच या खड्ड्याकडे असं स्थानिकांच म्हणणं आहे.

शिंदेच्या घरापासून अवघ्या २०० मीटरवरील परिस्थिती

एकनाथ शिंदे यांनी मंत्री झाल्यानंतर लुईसवाडीच्या सेवारस्त्याला लागून रोमा व्हिला नावाचा अलिशान बंगला बांधला. त्यांना अवघ्या काहीच महिन्यांमध्ये हा सेवा रस्ता ‘वन वे’ करण्यात आला आणि लुईसवाडीतून नितीनकडे जाणारा रस्ता बंद केला. वाहतूककोडीं टाळण्यासाठी असं केल्याचे वाहतूक पोलिसांनी तेव्हा सांगितल. मात्र मागील काही महिन्यांपासून हा बंद रस्ता पार्किंग लॉट म्हणून वापरला जात आहे. या रस्त्याऐवजी सेवा रस्त्यावरून थेट हायवेला एक्झिट देण्यात आला आहे. जिथून एकनाथ शिंदेंच्या गाड्यांचा ताफा मुंबईवरून आल्यावर त्यांच्या घराच्या दिशेला वळतो. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे फोटोतील रस्ता हा लुईसवाडीतील रिद्धी सिद्धी इमारतींजवळचा असून तिथे येणं जाणं नसतं शिंदे साहेंबांचं त्यामुळेच तो दुर्लक्षित असावा.

खडड्यांमधूनच स्थानिकांना प्रवास करावा लागतो

सार्वजनिक बांधकाम मंत्री राहतात तेथील रस्त्याची ही स्थिती म्हणजे प्रशासनाने किती दूर्लक्ष केलंय याचीच ही पोचपावती आहे. लुईसवाडीच्या नगरसेविका आहेत प्रभा बोरीटकर. त्यांनी या खड्ड्यांबद्दल अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना कळवल्याचे समजते. पण नगरसेवक सांगणार आणि अधिकारी ऐकणार तर ते अधिकारी कसले नाही का?

अगदी हजुरीपासून ते लुईसवाडीपर्यंत सर्वच स्थानिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो

महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या. त्यामुळे येथील लोकांनी प्रभा बोरीटकर (महिलांसाठी राखीव वॉर्ड) आणि अशोक वैती यांना निवडणून दिले. स्थानिकांमधील चर्चांप्रमाणे बोरीटकर आणि वैती यांचे जमत नाही त्यामुळेच निवडणुकांच्या उमेदवारीवरूनही कुरघोडी कऱण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आता निवडून आल्यानंतर दोघांनीही सोयिस्करपणे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा सूर नागरिकांनी लावला आहे. अशोक वैती तर महापालिकेचे माजी महापौर असून त्यांच्याच परिसरातील रस्त्यांची ही अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता शिंदे साहेबांनी सांगितलेल्या नवीन आयडियाच्या कल्पनेप्रमाणे खड्डे असणाऱ्या प्रभागातील अभियंत्यांचे फोटो लावण्यात यावेत फ्लेक्सवर त्या खड्ड्यांसमोर. शिंदे साहेब याच नियमाप्रमाणे आता तुमच्या घरासमोर कोणाचे फोटो लावायचे हेही एखादी पत्रकार परिषद घेऊन सांगा म्हणजे बरे होईल. नाही म्हणजे तुमचीच सत्ता असणाऱ्या महापालिकेतील शहर अभियंत्यांचे की या दोन शिवसेना नगरसेवकांचे की तुमचे स्वत:चे फोटो यावर लागलेले तुम्हाला आवडतील ते एकदा स्पष्ट करा फक्त. हल्ली तुम्ही अनेक चॅनेल्सला रस्त्यांची स्थिती ठीक करु वगैरे कमेन्ट देण्यात बिझी आहात पण थोडं लक्ष स्वत: राहता त्या भागातील रस्त्यांकडे दिल्यास तुम्हाला निवडून देणाऱ्यांचेही भले होईल.

शिंदेच्या घराकडे जाणाऱ्या एक्झीटचा

हा फोटो आहे हायवेवरून एकनाथ शिंदेच्या घराकडे जाणाऱ्या एक्झीटचा. याच रस्त्यावरील खड्डे स्कुटरचे चाक अडकेल एवढे मोठे आहेत.

रस्त्याची झालेली चाळण

ही रस्त्याची झालेली चाळण आहे शिंदेच्या घरापासून अवख्या २०० मीटरवरील. याच रस्त्यावर अनेक बँका, हॉटेल्स, लग्नाचे हॉल, आरटीओचे कार्यलय, एलआयसीचे मुख्य कार्यालय असल्याने इथे दिवसभर वर्दळ असते. त्यातही अगदी हजुरीपासून ते लुईसवाडीपर्यंत सर्वच स्थानिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. खड्ड्यांबरोबरच येथील मोठ्या हॉटेल्सला या रस्त्यांच्या दोन्ही बाजू ठाणे वाहतुक पोलिसांच्या आशिर्वादामुळे पार्किंग स्वरुपात आंदण म्हणून मिळाल्यासारख्या आहेत. अगदी हक्काने हे हॉटेल्स या जागी बॉडीगार्ड कम वॉचमन ठेऊन गाड्या रस्त्याच्या बाजूला पार्क करतात. या सर्वांचा त्रास स्थानिकांना होतो.