|| प्रसेनजीत इंगळे

महापालिकेकडे जन आरोग्य योजनेवरील खर्चाची माहिती नाही

विरार : वसई-विरार परिसरात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा सावळा गोंधळ अजूनही संपताना दिसत नाही. या योजनेतून अनेक हजारो रुग्णांना उपचार दिल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जाते, तर वसई-विरार महापालिकेत याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे. यामुळे हे नेमके लाभार्थी कोण, असे आरोप केले जात आहेत.

करोनाकाळात उपचारासाठी सामान्य नागरिकांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांना उपचारासाठी दिलासा मिळावा म्हणून सरसकट सर्वच आर्थिक वर्गासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. सदराची योजना राबविण्याचा भार जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यावर दिला होता.

त्या अनुषंगाने ही योजना वसई-विरार शहरात खासगी तथा शासकीय रुग्णालयात राबविण्यात आली होती, पण या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. दीपक झा यांनी माहिती दिली की, एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यांत वसई-विरार परिसरात १५६९ रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. ही माहिती तपासण्यासाठी वसईतील माहिती अधिकारी कार्यकर्ता तसनीम शेख यांनी या संदर्भात वसई-विरार महानगर पालिका आरोग्य विभाग यांच्याकडे या रुग्णाची माहिती मागितली असता सहायक जनसंपर्क अधिकारी वैद्यकीय आरोग्य रतेश किणी यांनी अशी कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत सदरची माहिती आमच्या कार्यालयाशी निगडित नाही, असा जबाब दिला.

शेख यांनी माहिती दिली की, करोनाकाळात वसई-विरारमध्ये केवळ स्टार रुग्णालय, गोल्डन पार्क रुग्णालय, जनसेवा रुग्णालय या रुग्णालयात ही योजना राबविण्यात आली होती आणि येथील रुग्णालये आम्ही योजना राबवत नसल्याचे सांगितले होते. असे असताना मग १५६९ रुग्णांना कसा आणि कुठे लाभ दिला, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सदरची माहिती खोटी असून महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभाग शासनाची फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गोंधळ अजूनही तसाच कायम आहे, अजूनही वसई-विरारमध्ये करोना रुग्ण सापडत आहेत. त्यांना इलाजासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. ही योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याने अनेक रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून आर्थिक लूट सुरूच आहे.