घाऊक तसेच किरकोळ बाजारात मिरचीची भाववाढ सुरूच असून कल्याण तसेच वाशीच्या बाजार समित्यांमधील घाऊक बाजारपेठेत हिरव्या मिरचीच्या दरांनी शंभरी गाठल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. घाऊक बाजारातील आवक घटल्याने मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारात मिरची मिळेनाशी झाली असून या ठिकाणी अवाच्या सव्वा दराने विकली जाऊ लागली आहे.
बाजार समित्यांमध्ये एरवी दिवसाला १५ ते २० टन इतक्या प्रमाणात मिरचीची आवक होत असते. यंदा दुष्काळामुळे मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या पंधरवडय़ापासून जेमतेम एक ते दोन टन इतकीच मिरचीची आवक घाऊक बाजारांमध्ये होत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारपेठेत मिरचीचे दर किलोमागे ८५ ते १०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील किरकोळ बाजारांत १५० ते १८० रुपये किलो एवढय़ा चढय़ा दराने हिरव्या मिरची विकली जात आहे.
ठाणे, मुंबई, कल्याण यासारख्या भागांमध्ये नंदुरबार, सांगली, पुणे, नाशिक आणि गुजरात येथुन मोठय़ा प्रमाणावर मिरचीची आयात केली जाते. तापमान वाढीचा मोठा फटका मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वाढीमुळे किरकोळ विक्रत्यांनी हिरव्या मसाल्यामधून मिरची वजा केलीच होती. मात्र आता मिरची बाजारातूनच बेपत्ता होईल काय, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.