ठाण्यातील पोखरण रस्ता एकीकडे नि:श्वास टाकत असताना शहरातील इतर भागांत राहणाऱ्या रहिवाशांनाही वेगवान आणि सुखकर प्रवासाची स्वप्ने पडू लागली आहे. पोखरण १ पाठोपाठ पोखरण रस्ता क्रमांक दोनच्या रुंदीकरणाची घोषणाही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. याशिवाय कळवा-खारेगाव हा प्रवास अधिक वेगवान व्हावा यासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. कळवा पुलास पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. ग्लॅडी अल्वारिस रोड, लालबहादूर शास्त्री मार्ग, दिवा-आगासन, दिवा-शीळ, टिकुजीनी वाडी, घोडबंदर तसेच ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात दाखविण्यात आलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि निर्मितीचे आव्हानही येत्या काळात महापालिकेस पेलावे लागणार आहे. पोखरणचा कित्ता इतरत्रही गिरवून ठाणेकरांच्या प्रवासाचा मार्ग प्रशस्त करून दिल्यास जयस्वाल यांचीही इतिहासात नोंद होईल हे मात्र नक्की.

ठाणे, कल्याणकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी या दोन्ही महापालिकांच्या प्रशासकीय प्रमुखांनी गेल्या महिना, पंधरवडय़ापासून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांच्या आड येणारी अतिक्रमणे पाडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोखरण रस्त्यांच्या रुंदीकरणास हात घातला आहे. कॅडबरी जंक्शन ते शास्त्रीनगपर्यंतचा हा रस्ता म्हणजे नव्या ठाण्यासाठी जणू हमरस्ताच. वर्तकनगर, लक्ष्मी पार्क, दोस्ती संकुले, म्हाडा वसाहती, शिवाईनगर, उपवनच्या दिशेने उभ्या राहिलेल्या शेकडो गृहसंकुलांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांसाठी हा सोयीचा रस्ता. मात्र नियोजन करताना दूरदृष्टी दाखवायची नाही असा जणू विडा उचललेल्या ठाणे पालिकेतील पूर्व प्रशासकीय प्रमुख आणि अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा रस्ता जेमतेम चार पदरी ठेवला. याशिवाय या रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या बेकायदा इमारतींकडे डोळेझाक केली ती वेगळीच. त्यामुळे सकाळ-सायंकाळ गर्दीच्या वेळेत या रस्त्यावरून वर्तकनगरचा नाका ओलांडायचा म्हणजे दिव्य असल्याचा अनुभव इतके वर्षे प्रवासी घेत होते. हा मार्ग कोंडीमुक्त व्हावा यासाठी जयस्वाल आणि त्यांच्या चमूने पद्धतशीर अशी आखणी करून रुंदीकरणाच्या आड येणारी अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यांत दोन्ही बाजूंनी रुंद अशा डांबरी पोखरण मार्गावरून प्रवाशांना मार्गक्रमण करता येणार आहे. नव्या ठाण्याचा हमरस्ता मानला जाणारा पोखरण रस्ता एकीकडे नि:श्वास टाकत असताना शहरातील इतर रस्त्यांच्या रुंदीकरणासाठीही महापालिकेस अशीच कठोर पावले उचलावी लागणार आहेत. कळवा-खारेगाव हे इनमीन पाच मिनिटांचे अंतर कापताना प्रवाशांची किमान ३० मिनिटे खर्ची पडतात. त्यामुळे पोखरणचा न्याय इतर भागांतील अतिक्रमणांनाही लावावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले होते. या कामांसाठी अनेक बांधकामे पाडण्यात आली होती. ठाण्यातील अनेक रस्ते आज जो काही नि:श्वास घेत आहेत त्याचे श्रेय चंद्रशेखर यांच्याकडे जाते. त्यांच्यानंतरही शहरात नानाविध प्रकारचे मोठे विकास प्रकल्प उभे राहिले. हे होत असताना ज्या वेगाने शहर वाढते आहे त्याची गरज भागविणाऱ्या धमन्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. कॅडबरी जंक्शन ते उपवनपर्यंतचा रस्ता हे त्याचे मोठे उदाहरण ठरावे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहराचे नागरीकरण पूर्णत: पश्चिमेकडे स्थिरावले आहे. दाटीवाटीने वसलेल्या शहरापेक्षा काहीसे दूर येऊरच्या निसर्गरम्य परिसराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांना आकडा काही लाखांच्या घरात आहे. पोखरणसारख्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कडेला जागोजागी बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले. वर्तकनगर नाका ओलांडताना प्रवाशांच्या नाकीनऊ येऊ लागले. दिवसेंदिवस वाढणारी कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाय आखण्याची आवश्यकता होती. तसा कोणताही प्रयत्न झाला नाही, उलट मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या भाडेपट्टा योजनेतील वसाहतींना याच भागात परवानग्या देण्यात आल्या. उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मध्यंतरी मांडण्यातही आला. असे प्रकल्प खर्चीक असल्याने महापालिका प्रशासनाने तो फारसा मनावर घेतला नाही. अखेर या मार्गालगत असलेल्या मोठय़ा कंपन्या आणि उद्योग समूहांशी सल्लामसलत करत जयस्वाल यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आखला आणि प्रत्यक्षात यावा यासाठी सलग तीन दिवस राबून अतिक्रमण पाडण्याची मोहीम फत्ते करण्यात आली. सध्या २४ फूट रुंद असलेला पोखरण रोड क्रमांक एक आता ४० फूट रुंद केला जाणार आहे. जयस्वाल आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग अशा दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने उपस्थित राहात अतिक्रमण हटाव मोहिमेचे नेतृत्व केले.
पोखरण रस्ता एकीकडे नि:श्वास टाकत असताना शहरातील इतर भागात राहाणाऱ्या रहिवाशांनाही वेगवान आणि सुखकर प्रवाशाची स्वप्ने पडू लागली आहेत. पोखरण १ पाठोपाठ दोनच्या रुंदीकरणाची घोषणाही जयस्वाल यांनी केली आहे. याशिवाय कळवा-खारेगाव हा प्रवास अधिक वेगवान व्हावा यासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यास सध्या येथील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कळवा पुलास पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हे करत असताना खारेगाव-पारसिकनगर, कळवा या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास प्रवाशांना ते हवेच आहे. ग्लॅडी अल्वारिस रोड, लालबहादूर शास्त्री मार्ग, दिवा-आगासन, दिवा-शीळ, टिकुजीनी वाडी, घोडबंदर तसेच ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात दाखविण्यात आलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि निर्मितीचे आव्हानही येत्या काळात महापालिकेस पेलावे लागणार आहे. टी. चंद्रशेखर यांच्याबरोबरीनेच जयस्वाल यांचे नावही शहराच्या इतिहासात नोंद होईल.

अनुभवी कंपनीलाच वृक्ष पुनर्रोपणाचे काम
पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचा आराखडा रचला जात असताना या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांची सरसकट कत्तल करण्याऐवजी त्यांचे पुनरेपण करता येईल का, असा विचार महापालिका स्तरावर करण्यात आला. शहरातील काही बडय़ा बिल्डरांच्या नागरी वसाहतींना हिरवा कंदील दाखविताना मोठय़ा प्रमाणावर वृक्ष कत्तलीस मंजुरी देणाऱ्या पालिकेने रस्ता रुंदीकरणात पर्यावरणाची हानी होऊ नये याची दक्षता घेतली हे एका अर्थाने चांगले झाले. या रस्त्याच्या रुंदीकरण कामात तब्बल ४३२ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार होती. शहरातील एखाद-दुसरी पर्यावरण संस्थेचा त्याविरोधात आवाज पुढे येण्याची शक्यताही होतीच. नरिमन पॉइंट, पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई विमानतळाच्या कामामुळे बाधित झालेल्या हजारो झाडांचे यशस्वी पुनरेपण यापूर्वी करण्यात आले आहे. यासंबंधीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या एका संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले आहे. रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालविताना त्या मोबदल्यात अन्यत्र नव्या झाडांची लागवड करण्याची प्रथा ठाणे महापालिकेत आहे. पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या वृक्षांवर मात्र जयस्वाल यांच्या कृपेमुळे महापालिकेच्या शहर विकास विभागाने दया दाखवली आहे. मुंबईस्थित क्रिएटिव्ह ग्रुपने झाडांच्या पुनरेपणाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केले असून त्याचे यश हे ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आल्याची माहिती शहर विकास विभागातले अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी दिली.