शवविच्छेदन अहवालानंतर उलगडा; दोघींनाही अटक
आईच्या मदतीने एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याचे नालासोपाऱ्यात उघड झाले आहे. हत्येनंतर या तरुणाने आत्महत्या केल्याचा बनाव या दोघींनी रचला. पण शवविच्छेदन अहवालानंतर त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आणि त्यानंतर पोलिसांनी दोघी माय-लेकीला अटक केली.
नालासोपारा पश्चिमेला श्रीपस्थ वसाहतीमधील गुलमोहर इमारतीत दीपक सिंग (२६) हा पत्नी अर्चना (२४) आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होता. शुक्रवारी रात्री त्याने बोरिवली येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला घरी मद्यपानासाठी बोलावले होते. रात्री दहाच्या सुमारास त्याचा मित्र घरी पोहोचला, तेव्हा दीपक घरात मृतावस्थेत आढळून आला होता. दीपक घरात कुणी नसताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. पण खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. त्या वेळी दीपकची सासूदेखील घरामध्ये हजर होती. मित्राला संशय आल्याने त्याने नालासोपारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची आपत्कालीन मृत्यू म्हणून नोंद करून दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला.
दीपकचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले होते. पोलिसांनी लगेच त्याची पत्नी अर्चना आणि सासू आशा सिंग यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या दोघींनी दीपकच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकचा औषधेविक्रीचा व्यवसाय होता. त्याचे अर्चनासोबत नेहमी भांडणे होत होती. त्यात त्याला दारूचे व्यसन जडले होते. घटनेच्या दिवशी अर्चना आणि दीपकचे भांडण झाले होते. तेव्हा तिने हनुमाननगरात राहणाऱ्या आपल्या आईला घरी बोलावले. दोघींनी मिळून दीपकची हत्या केली. या दोघींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.