प्रवाशांना मासिक पासमध्ये सवलत

वसई-विरारच्या रहिवाशांचा स्थानिक प्रवास सुलभ व्हावा यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पालिका परिवहनच्या बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा देण्यात येणार आहे. त्याशिवाय मासिक पासातही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन सेवा ३ ऑक्टोबरला पाचव्या वर्षांत पदार्पण करत असल्याने नागरिकांना ही भेट देण्यात येणार आहे. नगरसेवक आणि पालिका पदाधिकाऱ्यांना मोफत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

वसई-विरार शहर महापालिकेतर्फे नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या परिवहन सेवेला ३ ऑक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने परिवहन सेवेत विविध अत्याधुनिक सेवा सुविधा नागरिकांना देण्याचा निर्णय परिवहन सेवेच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्या डायलिसिस रुग्णांना प्रवासादरम्यान होत असलेल्या गैरसोयी लक्षात घेता त्यांना अपंगांच्या राखीव आसनाचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून बसच्या पुढील दरवाजातून प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे.

बसमध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून बसची सविस्तर  माहिती देणारे अ‍ॅप विकसित केले आहे, तसेच प्रवाशांना दोन महिन्याच्या प्रवासी पासाच्या दरात तीन महिन्याचा प्रवासी पास उपलब्ध करणार असून स्मार्टकार्डचे मूल्य ५० रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे. आजी व माजी आमदार, खासदार व विद्यमान नगरसेवक, परिवहन समिती सदस्य यांना स्वत:चे ओळखपत्र दाखविल्यास मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या सर्व निर्णयाची अंमलबजावणी ३ ऑक्टोबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी दिली.