शहापूर तालुक्यातील वनक्षेत्रात रोज वन्यजीवांची कत्तल; सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत शिकाऱ्यांची टोळी जंगलात

कल्याण : शहापूर तालुक्यातील धसई वनक्षेत्रपाल यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळेत उच्चतम प्रकाशझोताच्या विजेऱ्या घेऊन २५ ते ३० शिकाऱ्यांचा घोळका जंगलात शिकारीसाठी घुसतो. सायंकाळी सातपासून पहाटे पाचपर्यंत हे शिकारी वन्यप्राणी, पक्षी यांची शिकार करतात. शस्त्राच्या टप्प्यात असलेल्या प्राण्यांना ठार मारण्याखेरीज प्राण्यांसाठी जंगलात सापळेही लावण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यांत हा प्रकार वाढला असला तरी, वन विभागाकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपूर्वी मळेगाव-शेणवे वनहद्दीत शिकाऱ्यांनी पाच ते सहा मोरांची शिकार केली होती. सध्या या परिसरात डझनभर मोरांचे वास्तव्य आहे. त्यांना लक्ष्य करण्यासाठी शिकाऱ्यांची टोळी शेणवे गाव परिसरातील घोळ, पठार, आडाचा घोळ या राखीव जंगलात हिंडत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या टोळीत परिसरातील काही ग्रामस्थांचाही सहभाग असतो. भाले, कुऱ्हाडी, कोयते, गोफण, चाकू अशा शस्त्रांनी सज्ज हे शिकारी सायंकाळी सातनंतर जंगलात शिरतात. काही दिवसांपूर्वी दोन ग्रामस्थांनी या शिकाऱ्यांना विरोध केला असता, या टोळीने त्यांच्यावर हल्ला करून पलायन केले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

रविवारी (ता. २३) रात्री १० वाजता शेणवे, कुलवंत, मुसई हद्दीतील जंगलात ३० शिकारी रात्रभर फिरत होते. हे शिकारी शस्त्रसज्ज असल्याने ग्रामस्थांना त्यांना शिकारीसाठी अटकाव करता आला नाही. काही जागरूक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ‘हॅलो फॉरेस्ट’ (१९२६) या टोल फ्री क्रमांकावर साधला. या क्रमांकावर सातत्याने ‘द नंबर इज कन्जेस्टेड’ अशी ध्वनिफीत ऐकवली जात होती. वन विभागाच्या भरारी पथकाच्या मोबाइलवर, वन विभागाच्या ठाणे, शहापूर कार्यालयांमध्ये संपर्क साधला. पण कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या तोंडावर पुन्हा शिकाऱ्यांनी या भागात डेरा टाकला आहे. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुसळधार पाऊस सुरू होईपर्यंत पोलिसांच्या सहकार्याने रात्रीच्या वेळेत पाळत ठेवली तर हे शिकारी वन विभागाच्या जाळ्यात अडकतील, अशी शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली.  उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्याशी संपर्क साधला, ते क्षेत्रीय कामासाठी बाहेर असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

वनसंपदेचे नुकसान

धसई वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या हद्दीतील शेणवे, मळेगाव, कुडशेत, मुसई, धसई, पठार या पट्टय़ात काही प्रमाणात राखीव जंगल आणि धरण, ओहोळ, पाण्याने भरलेल्या खदानी आहेत. या जंगल, पाण्याच्या आडोशाने अनेक जंगली प्राणी या भागात अधिवास करून आहेत. या जंगलात सध्या १० ते १५ मोर, नील गाई, रानडुक्कर, ससे, भेकर, चितळ, लावऱ्या असे पक्षी, प्राणी आहेत. मात्र, शिकाऱ्यांनी हळूहळू ही वनसंपदा नष्ट करण्यास सुरुवात केली आहे, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी केली. पाऊस सुरू होण्यापूर्वी वन्यप्राण्यांचे रक्तप्राशन केले की शरीराला ऊर्जा मिळते, असा समज असलेल्या एका समाजातील शिकारी यात आघाडीवर आहेत.

शिकारी ज्या मळेगाव, शेणवे पट्टय़ात फिरतात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येईल. ते शिकारीसाठीच फिरतात याची खात्री पटल्यावर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

सतीश तोरडमल, क्षेत्रीय वनाधिकारी, धसई वन विभाग