गायी, कुत्रे, माकडे यांच्यात आजारांचा प्रादुर्भाव; कचरा गाडी येत नसल्यामुळे रस्त्यांवर ढीग
येऊरच्या वनसंपदेवर अतिक्रमणे करून मानवी वस्त्या, हॉटेले, ढाबे उभारण्याच्या प्रकारांमुळे येथील जीवसृष्टीला धक्का पोहोचत असतानाच आता अशा ठिकाणी होणाऱ्या कचऱ्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. येऊरमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून या ठिकाणी खाद्याच्या शोधात येणाऱ्या गायी, कुत्री, माकडे यांना विविध आजारांची लागण होत आहे. येऊरमधील खदाणीत उतरून स्नानविधी उरकणाऱ्या रहिवाशांच्या सवयीने येथे जलप्रदूषणदेखील वाढत असल्याचे निरीक्षण प्राणीतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
येऊर गावात काही हॉटेल्सच्या परिसरात सतत कचऱ्याचा ढीग साचतो. या ठिकाणापासून काही अंतरावर गौशाला आहे. गावात गायी फिरत असताना खाद्याच्या शोधात कचऱ्याच्या ठिकाणी येतात. कचऱ्यात आपले खाद्य शोधण्याचा प्रयत्न करतात. काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या या कचऱ्यात असल्याने प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून उघडय़ावर टाकलेले अन्न साचत असल्याने परिसरात दरुगधी असते. हॉटेल्स पाटर्य़ासाठी येणारे नागरिक त्यांच्याकडील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट न करता या कचऱ्याच्या ढिगावरच भर टाकतात. कचरा कुंडीजवळ असणाऱ्या कुत्र्यांच्या शोधात बिबटे येण्याची भीती यामुळे पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत कचरा कुंडीची सोय करून देण्यात आली होती. मात्र सध्या येऊर गावात कचऱ्याची कुंडी नसल्याने येऊर गावातील नागरिक घरातील कचरा या ठिकाणी येऊन टाकतात. या संदर्भात अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशनचे मित आशर यांनी वनविभागाकडे तक्रार केली असता दररोज येऊरमधील कचरा गोळा करण्यासाठी वाहन येत नसल्याने कचऱ्याचा ढीग साचतो, असे कारण वनविभागाकडून सांगण्यात आले.

खदाणीतील मासे, कासवांना धोका
येऊरमध्ये प्रवेश केल्यावर डावीकडील बाजूस पाण्याने भरलेली खदाण आहे. या ठिकाणी नागरिक पाटर्य़ासाठी जात असल्याने प्राण्यांना पिण्यासाठी असणारे पाणीदेखील दूषित होत आहे. काही नागरिक खदाणीतील मासे पकडत असल्याने मानवी हस्तक्षेपामुळे येथील मासे, कासवांना धोका पोहचत असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय पावसाळ्यात या खदाणीतील पाणी वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे ठिकाण धोक्याचे झाले आहे, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.