मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; मुरबाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

मुरबाड येथे मानवी वस्त्यांलगतचा बिबटय़ांचा वावर आणि नरभक्षक बिबटय़ाच्या हत्येसाठी सरसावलेल्या प्रशासकीय यंत्रणांमुळे वन्यप्रेमींमध्ये एकीकडे कमालीची अस्वस्थता असतानाच ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या शहरांमधील अनेक वन्यप्रेमी संस्था सध्या मुरबाडमधील गावागावांमधून मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष कमी व्हावा यासाठी पुढाकार घेत आहेत. या भागातील शाळा, महाविद्यालयांमधून ‘वन्यजीव आणि मानवी हस्तक्षेपाचे व्यवस्थापन’ या विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन होऊ लागले असून वन्यप्रेमींचा हा पुढाकार स्थानिकांनाही अचंबित करत आहे.

मुंबई, ठाण्यातील मानवी वस्त्यांमध्ये अलीकडच्या काळात वन्यजीवांचा वावर वाढल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी पायथ्याशी बडय़ा बिल्डरांची गृहसंकुले उभी राहू लागली आहेत. वनांना खेटून निसर्गाच्या सान्निध्यात अशा जाहिराती करत चढय़ा दरांनी या घरांची विक्री सुरू असून हजारोंच्या संख्येने रहिवाशांचे वास्तव्य या भागात होऊ लागले आहे. मध्यंतरी मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरने घोडबंदर भागात उभारलेल्या विशेष नागरी वसाहतीत बिबटय़ाचे दर्शन घडले होते. त्यानंतर बिबटय़ांना आवरण्यासाठी या भागात रहिवाशांच्या बैठकांचे जणू सत्रच सुरू झाले होते. मात्र, या भागातील स्थानिक ग्रामस्थांच्या मते, हा संपूर्ण परिसरात एकेकाळी हक्काचा अधिवास असायचा. त्यामुळे मानवी अतिक्रमणाचा मुद्दा मोठय़ा प्रमाणावर चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी मुरबाड येथील जंगलांमधून मानवी वस्त्यांमध्ये बिबटय़ाचा वावर वाढल्याच्या तक्रारी वाढल्याने एका नरभक्षक बिबटय़ाला वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी गोळी घालून ठार मारले होते. तेव्हापासून हा संपूर्ण परिसर वन्यप्राणी आणि मानवी हस्तक्षेपांसाठी चर्चेत आला आहे.

वन्यजीव संस्था सरसावल्या

मुंबईस्थित ‘रेसकिंक असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर’ (रॉ) या संस्थेच्या वतीने या भागातील गावातील शाळांमध्ये नुकतीच वन्यजीवांविषयी जागृती करण्यात आली. ‘वन्यजीव आणि मानवी हस्तक्षेपाचे व्यवस्थापन’ या विषयासंबंधी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. अनेकदा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये काही वन्यजीवांच्या बाबतीत गैरसमज असतात. यासाठी नागरिकांना या प्राण्यांविषयी माहिती देणे गरजेचे असते. मुरबाड येथे झालेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले. वन्यजीवांपासून बचाव कसा करावा, कोणते वन्यजीव घातक याची सखोल माहिती नागरिकांना मिळावी यासाठी या संस्थेच्या वतीने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुख्यत: जंगलात आढळणारे प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी माहिती देण्यात आली. सापाने दंश केल्यास तातडीचे कोणते उपचार करावेत, वानरांवरील नियंत्रण, मानव-बिबटय़ाचे हस्तक्षेप आणि व्यवस्थापन, एकत्रित करायच्या उपाययोजना याविषयी जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.  मुरबाडच्या विविध शाळांमधील ४५५ विद्यार्थी आणि ५० शिक्षकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला होता.