उद्धव ठाकरे यांची घोषणा
महाराष्ट्राची एक ठळक सांस्कृतिक खूण असलेल्या नाटय़कलेविषयीच्या दस्तावेजांचे एकाच ठिकाणी जतन व्हावे, या हेतूने मुंबईत एक भव्य नाटय़ संग्रहालय उभारण्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नाटय़ संमेलनाचे उद्घाटक उद्धव ठाकरे यांनी ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
नाटय़परंपरेला प्रोत्साहन देणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नाटय़चळवळ टिकावी म्हणून शासन अथवा महापालिकांच्या माध्यमातून शक्य त्या सर्व सोयी-सवलती देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. पडद्यामागच्या कलावंतांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात सवलतीच्या दरात शुश्रूषा देण्याची नाटय़ परिषदेची मागणीही त्यांनी मान्य केली.
फय्याज यांनी आपल्या भाषणात संमेलनाच्या अध्यक्षपदाचा अपुरा कालावधी आणि त्याला नसलेल्या कोणत्याही अधिकाराविषयी खंत व्यक्त केली होती. त्यावर ‘अधिकार हे मागून मिळत नसतात, तर ते गाजवावे लागतात,’ असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी त्यांच्या भाषणात, पडद्यामागच्या कलावंतांना महापालिकेच्या रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार मिळावेत. बालनाटय़ांना सवलतीच्या दरात नाटय़गृहे मिळावीत. पडद्यामागील कलावंतांच्या गृहवसाहतीसाठी तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मालवणी येथे दिलेला पाच एकरचा भूखंड सीआरझेडमध्ये गेला. त्यामुळे त्याऐवजी आता गोरेगाव किंवा मालाड परिसरात भूखंड मिळावा, अशा मागण्या केल्या. संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘रंगयात्रा’ या स्मरणिकेचे तसेच प्रभाकर पणशीकर आणि लता मंगेशकर यांच्याविषयीच्या दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.