डीएसपी गेट परिसरातून शेकडो बाटल्या, काचांचे अगणित तुकडे हस्तगत; भर रस्त्यात होणाऱ्या मद्यपींच्या पाटर्य़ाकडेही वन विभाग, पोलिसांचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येऊरच्या जंगलात अनधिकृतपणे प्रवेश करून मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला अद्याप यश मिळाले नसून जंगलातील दारू पाटर्य़ाचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. बुधवारी सकाळी ठाण्यातील पर्यावरणप्रेमी आदित्य सालेकर आणि मित आशर हे तरुण येऊरच्या डीएसपी गेट परिसरात दाखल झाले. त्या वेळी त्यांना या भागात शेकडो मद्याच्या बाटल्यांचा खच असल्याचे दिसून आले. त्यांनी या बाटल्या एकत्र करून तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात काचांचाही खच असल्याचे त्यांना दिसले. वन विभाग आणि पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे येऊरचे जंगल मद्यपींसाठी दारू पिण्याचा अड्डा बनत चालल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ठाणे शहरालगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा येऊर परिसर निसर्गसंपदेने बहरलेला असला तरी दररोज होणाऱ्या मद्यपींच्या पाटर्य़ामुळे त्याला अवकळा येऊ लागली आहे. गाडय़ांच्या ताफ्यासह जंगलात येऊन भररस्त्यात दारूच्या पाटर्य़ा करणाऱ्या तरुणांना वन विभाग अथवा पोलिसांकडून आडकाठी होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले आहे. येऊरमध्ये प्रवेश केल्यानंतर मद्यपींचा मोर्चा थेट डीएसपी गेट परिसरातील रस्त्याकडे वळतो व येथे रात्रभर मद्यपान केले जाते. मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या या नशेबाजांकडून दारूच्या बाटल्या रस्त्यात फोडणे, जंगलात कुठेही फेकणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी याबाबत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. डीएसपी गेट परिसरात शनिवार-रविवार दारू पाटर्य़ा होत असून पोलीस केवळ त्यांना पाटर्य़ा आवरण्याच्या सूचना देतात. हे प्रकार थांबवण्यासाठी येथे कडक कारवाईची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आदित्य सालेकर याने दिली.

पोलीस आणि वन विभागामध्ये समन्वय नाही..

येऊर परिसरामध्ये सुरू असलेल्या दारू पाटर्य़ाविषयी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर या भागातील वन कर्मचारी रस्त्यांवरील पाटर्य़ावर आमचे र्निबध नाही. या पाटर्य़ावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे सांगतात, तर या भागात केवळ दोन पोलीस गस्त घालत असले तरी ते साधारणपणे पाटर्य़ाकडे दुर्लक्ष करतात. या भागामध्ये पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण जंगलातील अति संवेदनशील परिसरावर लक्ष ठेवून असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणे योग्य ठरेल, अशी मागणी वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wine bottles tock in yeoor forest
First published on: 20-05-2016 at 01:45 IST