भाग्यश्री प्रधान

विंग्स फॉर ड्रीम्स, शहापूर

शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र अनेकांना आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे शिकता येत नाही. कोवळ्या वयात जबाबदाऱ्या पडल्यामुळे काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे पुढील आयुष्यात ती व्यक्ती दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकते. ठाणे जिल्ह्य़ात अशा गुणी आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या काही संस्था आहेत. विंग्स फॉर ड्रीम्स त्यापैकीच एक. शहापूर तालुक्यातून या संस्थेचे काम सुरू झाले. यंदाच्या दिवाळीत या संस्थेला एक तप पूर्ण झाले. यानिमित्ताने या संस्थेच्या वाटचालीचा आढावा..

मुंबईलगत असला तरी ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील काही भाग अतिशय दुर्गम आहे. तिथे अगदी प्राथमिक सुविधांचाही अभाव आहे. शहापूर तालुका त्यापैकीच एक. या तालुक्यात बेलवली हे डोंगराच्या कुशीतील एक गांव आहे. ठाणे शहरात राहणारे धीरज डोंगरे यांची या शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली. नुकतेच डी.एड. झालेल्या डोंगरे यांची ही पहिलीच नोकरी. जंगलातून वाट काढत ते बेलवलीचा पत्ता शोधत तिथे गेले. गावातील शाळेची परिस्थिती पाहून आल्या पावली परत जावे असे त्यांना वाटले. मात्र ग्रामस्थांच्या आग्रहामुळे ते थांबले. शिक्षणाच्या अभावामुळे गावची ही परिस्थिती आहे. एक महिनाभर तिथे राहिल्यानंतर त्यांना हळूहळू त्याची कल्पना आली. त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. त्यांच्याशी संवाद साधला. मुलांच्या तुलनेत मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाकी सर्वत्र शिक्षणात मुली सरस असताना बेलवलीत असे का असा प्रश्न त्यांना पडला. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांना दिसून आले. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात स्वत:पासून करायची असते. धीरज डोंगरेसरांनी तेच केले. शाळेतील दोन विद्यार्थिनींचा खर्च त्यांनी उचलला. त्यांनी त्यांच्या शहरातील मित्रांनाही याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनीही काही विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे पहिल्याच वर्षी २५ विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त झाला. त्या शाळेत येऊ लागल्या. त्यांना, त्यांच्या पालकांना शाळेविषयी आपुलकी वाटू लागली. १२ वर्षांपूर्वी एकाने सुरू केलेल्या या चांगल्या उपक्रमाचे आता चळवळीत रूपांतर झाले आहे. तब्बल ७०० जण त्यात सहभागी झाले आहेत. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर तसेच परदेशातूनही मदतीचे हात पुढे आल्याची माहिती धीरज यांनी दिली.

सुरुवातीची अनेक वर्षे संस्थेचा कारभार अनौपचारिक पद्धतीने सुरू होता. मात्र पुढे पसारा वाढत गेल्याने २० जानेवारी २०१६ रोजी संस्थेची नोंदणी करण्यात आली. येत्या २० जानेवारी रोजी या संस्थेला अधिकृतपणे तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. या संस्थेच्या स्थापनेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्व मदत वस्तूरूपाने घेतली जात होती. दत्तक घेतलेल्या २५ विद्यार्थिनीपैकी पूजा भोईर ही विद्यार्थिनी आता गायिका म्हणून नावारूपास येत आहे तर दोन विद्यार्थिनी नर्सिगला आहेत. २५ विद्यार्थिनींनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले.

विद्यार्थ्यांसाठीही कबड्डी तसेच इतर खेळांचे प्रशिक्षण संस्था आयोजित करते. त्याचप्रमाणे गावात निरनिराळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमापलीकडच्या जगाची ओळख व्हावी, निरनिराळी कौशल्ये त्यांनी आत्मसात करावीत, हा त्यामागचा उद्देश आहे. हस्तकला, पाककला आदी प्रशिक्षण वर्गही संस्थेच्या माध्यमातून गावात भरविले जातात. विद्यार्थ्यांचा कल आणि आवड लक्षात घेऊन त्याला त्याविषयाच्या अधिक प्रशिक्षणाची संधी दिली जाते.  जून महिन्यात दत्तक मुलींच्या पालकांसमवेत एक स्नेहमेळावा भरविला जातो. या मेळाव्यात विद्यार्थिनी काय करत आहेत, त्यांचंी प्रगती कशी सुरू आहे, याची माहिती पालकांना दिली जाते.