अंबरनाथमधील आदिवासी संशोधकाचा पर्यावरणस्नेही उपाय; यंत्राच्या पेटंटसाठीही अर्ज
अनेकदा जवळ स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने आता या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणीउपसा करणारे यंत्र रामचंद्र खोडका यांनी तयार केले असून त्याद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जाते. या पर्यावरणस्नेही यंत्राच्या पेटंटसाठीही त्याने अर्ज दाखल केला आहे.
आयटीआयमधून वेल्डरची पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रामचंद्र खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून वेल्डिंगचा व्यवसाय केला. त्यानंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागीर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात रामचंद्र खोडका शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का याचा विचार ते करू लागले. धरणामुळे बारवी नदी बारमाही वाहती आहे. प्रवाहाच्या शक्तीमुळे नदीपात्रात त्यांनी बसविलेला चार पात्याचा लोखंडी पंखा फिरतो आणि पाणी उपसले जाते. या प्रक्रियेत कुठेही वीज, डिझेल अथवा अन्य कोणतेही इंधन वापरले जात नाहीच, उलट उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य होते. दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना ६० हजार रुपये खर्च आला.

साधारण पावसाळ्यानंतर शेतीत कोणतेही पीक घ्यायचे म्हटले तर नदीतून पाणीउपसा करण्यासाठी वीज अथवा डिझेलसाठी खर्च करावा लागतो. या यंत्राने तो खर्च पूर्णपणे वाचेल. शिवाय काही प्रमाणात वीजनिर्मिती होईल. या यंत्राची फारशी देखभाल करावी लागणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे.
– रामचंद्र खोडका, चोण