मंत्रालयात मोठय़ा हुद्दय़ावर आहे.. एकच काय पंचवीस जणांना नोकरीला लावू शकते…सध्या निवडणुकीची भरपूर कामे आहेत, त्यामुळे मला वीस जागा भरण्याचा कोटा मिळाला आहे. त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील..अशा बतावण्या करत स्नेहल पेम या महिलेने १४ बेरोजगार तरुणांना तब्बल सात लाखांचा गंडा घातला. सहा महिन्यांपूर्वी नौपाडा पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर नौपाडा पोलिसांच्या पथकाने सोमवारी तिला बेडय़ा ठोकल्या.
ठाणे येथील लोकमान्यनगर भागात दिलीप केंजळे राहत असून त्यांचा कापड विक्री व शिवणकामाचा व्यवसाय आहे. त्यांचा भाचा विकास जाधव हा त्यांच्याकडे राहत असून तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. ही नोकरी कायमस्वरूपी नसल्यामुळे तो कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात होता. असे असतानाच परिचित असलेल्या मिलींद मोने याने दिलीप यांची स्नेहल सावंत या महिलेशी भेट घालून दिली. सविता ही मंत्रालयात मोठय़ा हुद्दय़ावर असून तिनेच माझी टिएमटीची नोकरी पुन्हा मिळवून दिली, असे मिलींदने त्यांना सांगितले. तसेच भाचा विकास जाधवला ही नोकरी मिळवून देऊ शकते, असेही त्याने सांगितले होते. त्यामुळे दिलीप यांनी खातरजमा करण्यासाठी तिचे नोकरीचे ओळखपत्र पाहिले. त्यावर महाराष्ट्र शासन मंत्रालयाचा उल्लेख असल्यामुळे ते तिच्या जाळ्यात अडकले. एकच काय पंचवीस जणांना नोकरीला लावू शकते. सध्या निवडणूकीची भरपूर कामे आहेत म्हणून मला वीस जागा भरण्याचा कोटा मिळाला आहे, पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, अशा बतावण्या तिने त्यावेळी केल्या. या भुलथापांना बळी पडून दिलीप यांनी नातेवाईक तसेच अन्य मित्रांना नोकरीची माहिती दिली. त्यानुसार एकूण १४ जण पैसे भरण्यास तयार झाले आणि प्रत्येकी ५० हजार प्रमाणे सात लाख रुपये तिला देण्यात आले. मात्र, पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्यामुळे दिलीप यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर सर्वाचे ओळखपत्र तयार झाले असून पोस्टाने घरपोच येईल अशी बतावणी तिने पुन्हा केली.
तीन महिने उलटूनही पोस्टाने ओळखपत्र घरी आले नाही म्हणून दिलीप तिच्या मुंबईतील घरी गेले. तिथे तिचे पती त्यांना भेटले आणि त्यांनी तिच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याचवेळी तिचे नाव स्नेहल सावंत नसून स्नेहल पेम असल्याचे त्यांना समजले. अखेर त्यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, स्नेहल कोमात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीप यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ती पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर सोमवारी पथकाने तिला अटक केली. ठाणे न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.