अधिकृतवर अनधिकृत जाहिरातींचे फलक

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरांतील रस्त्याकडील मोक्याच्या जागेवर काही अधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. परंतु या जाहिरातस्थळीच बेकायदा जाहिरात फलक लावण्याचे प्रकार सुरु आहेत. टिटवाळ्यात अशाच एका लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकावर जाहिरात एजन्सीच्या महिला अधिकाऱ्याने चांगलाच दणका दिला. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची असलेली ही जाहिरात उतरवित असताना  त्याच वेळी पदाधिकाऱ्याचे समर्थकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकाऱ्याचा पवित्रा पाहता या पदाधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याची माफी मागण्याची नामुष्की ओढावून घेण्याची वेळ आली.

महापालिकेने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरांत रस्त्याकडेच्या मोक्याच्या जागा अधिकृतरित्या जाहिरात फलकांसाठी ठेकेदारांना दिल्या आहेत. या जाहिरातीमार्फत पालिकेच्या महसुलात वाढ होत आहे.   टिटवाळ्यात अशाच पद्धतीने विजय अ‍ॅडव्हर्टायझिंग या जाहिरात एजन्सीला अधिकृतरित्या जाहिरात फलकांसाठी जागा दिल्या आहेत. या एजन्सीच्या जाहिरात फलकांवर  भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने वाढदिवसाचे अनधिकृत फलक लावण्यात आले होते. त्याची माहिती  एजन्सी चालकांना मिळाली.  त्यांनी याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता वाढदिवसाचे फलक अधिकृत लावले नसल्याचे समजले. त्यांनी एजन्सीतील महिला अधिकाऱ्यास हि माहिती दिली.

महिला अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत जाहिरात स्थळी येऊन या जाहिराती कामगारांच्या साह्य़ाने काढण्यास सुरुवात केली.  हा प्रकार कळताच भाजपच्या पदाधिकाऱ्याने   भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्या महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रकार केला. इतकेच नाही  या पदाधिकाऱ्याने आपले समर्थक पाठवून महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालायला लावली. ऐवढय़ावरच न थांबता  महिला अधिकारी ऐकत नाही म्हणून तिच्या वाहनाची काच दगडाने फोडली. नंतर समर्थकाने स्वत:च्या वाहनाची काच फोडून घेतली आणि  टिटवाळा पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास गेला, असता ही महिला अधिकारी चक्क निवृत्त साहाय्यक पोलीस अधिकारी असल्याचे कळल्यावर त्यांची पाचावर धारण उडाली.

भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रकाराने  या महिलेने  भारतीय दंड संहितेमधील अत्यावश्यक कलमांचा वापर करून गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. हे पाहून या पदाधिकाऱ्याचे  अवसानच गळाले.

अधिकृत जाहिरात फलकावर अनधिकृत जाहिरात फलक लावल्याबद्दल या महिला अधिकाऱ्याने नुकसानीपोटी ६० हजार रुपये देण्याचे फर्मावले.  आपल्या हातून मोठी चूक झाली आहे, हे लक्षात येताच नरमलेल्या या पदाधिकाऱ्याने अखेर  या महिला अधिकाऱ्याची माफी मागावी लागली.  पोलीस ठाण्याबाहेर तडजोडीने हे प्रकरण मिटविण्यात आले.

महिला अधिकाऱ्याने  फलकावरील जाहिरातीपोटी पदाधिकाऱ्याला नुकसानभरपाईपोटी ६० हजार रुपये देण्यास सांगितले होते. परंतु पुढे कोणती अडचणच नको म्हणून वाढीव १५ हजार रुपये दंड असे एकूण ७५ हजार रुपये देऊन हे प्रकरण मिटवण्याची या नामुष्की या पदाधिकाऱ्यावर आली.