बसायला जागा मिळत नसल्याने महिला प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा

विरार : विरारहून चर्चगेटला सुटणारी लोकल पकडण्यासाठी नालासोपारा येथून बसून येणाऱ्या महिला प्रवाशांविरोधात आता विरारच्या महिला प्रवासी आंदोलन करणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर मुंबईला जाणाऱ्या बहुतांश लोकल विरार स्थानकातून सुटतात. मात्र विरार स्थानकातून सुटणाऱ्या या लोकलमध्ये बसता यावे यासाठी नालासोपारा येथील प्रवासी आधीच बसून विरारला येतात. पुरुष प्रवाशांची ही समस्या आता महिलांना भेडसावू लागली आहे. नालासोपारा स्थानकातूनच जागा अडवून विरार लोकल पकडणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे विरार महिला प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही.

लोकल विरारला येतानाच नालासोपाऱ्याहून भरून आलेली असते. त्यामुळे विरार महिला प्रवाशांना उभे राहून जावे लागते. पूर्वी ही संख्या फार कमी होती. पण ही जागा मिळवण्याची सोपी पद्धत असल्यामुळे नालासोपाऱ्यातील बहुतांश महिला प्रवासी डाऊनचा पर्याय निवडत आहेत. विरारच्या महिला प्रवाशांनी याबाबत अनेकदा रेल्वे सुरक्षा बलाकडे याबद्दल तक्रार केली, मात्र तरीही या समस्येवर तोडगा काढण्यात आलेला नाही.

नालासोपाराहून विरारला येणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेकदा रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार करण्यात आली आहे, पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रक्रारची मदत मिळत नसल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा विरारमधील महिला प्रवाशांनी केला आहे.

प्रवाशांचा संताप

नालासोपाराहून महिला बसून येणार असतील आणि जागा अडवणार असतील तर मग विरारहून ट्रेन पकडण्याचा उपयोग काय? ट्रेन पकडण्यासाठी आम्ही अर्धा तास आधी येऊन उभे असतो. मात्र बसायला जागा मिळत नसल्याने दादपर्यंत उभ्याने प्रवास करावा लागतो, असे – संगीता तवटे यांनी सांगितले. तर नालासोपाऱ्यातील महिला प्रवाशांच्या विरोधात वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही. विरारच्या सर्व महिला प्रवाशांना एकत्र करत असून आंदोलन करणार आहोत, असे अंजू पाटील म्हणाल्या.