पालघर येथील डॉ.एम.एल ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपला मानसिक छळ झाल्याची तक्रार पालघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर पालघर पोलीसांनी १५ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पालघर येथील डॉ. एम. एल ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार पालघर पोलीस ठाण्यात दिली होती. ३० विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी असे एकूण ३१ जणांची तुकडी एमडी होमिओपथी शिक्षण घेण्यासाठी पाच दिवसांपूर्वी पालघर येथे दाखल झाली होती. या तुकडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फ्रेशर्स पार्टी’ च्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे, तसेच त्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत गुरुवारी रात्री रुग्णालयातील नित्याचे काम संपवून बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार एका विद्यर्थ्यांनी केली होती. तसेच गेल्या काही दिवस अपमास्पदरित्या वागवलं गेल्याचे तसेच फ्रेशर्स पार्टीच्या निमित्ताने रात्री उशिराने बैठक आयोजित करून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारदार विद्यार्थिनीचे म्हणणे आहे.

पालघर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन १५ जणांविरोधात रॅगिंग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, यानंतर महाविद्यालयानंही आपली भूमिका मांडली आहे. आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आपल्याला मानसिक त्रास झाला अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीनं पालघर पोलिसांकडे दाखल केली आहे. असे करण्यापूर्वी त्यांनी ढवळे महाविद्यालयातील कुठल्याही अधिकाऱ्यांकडे आपली भूमिका किंवा तक्रार मांडली नव्हती. तसेच त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्राचार्य व अँटी रॅगिंग सेलच्या अध्यक्ष यांच्याशी बोलण्यास त्यांनी नकार दिला होता, असं महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

संस्थेच्या इतिहासातील पहिलीच घटना
सध्या पोलीस तपास सुरू असून यामध्ये संस्थेकडून पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. दरम्यान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी संस्थेने संपर्क साधला असता या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग किंवा मानसिक छळ झाला नसल्याचे सर्वांनी एक मताने सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचं अभद्र, अश्लील संभाषण किंवा कृती झाली नसल्याचंही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी संस्थेकडून अंतर्गत चौकशी सुरू आहे. डॉ. ढवळे इन्स्टिट्यूट ही शासनाच्या रॅगिंग संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून रॅगिंग विषयाचे सर्व नियम संस्थेने आपल्या प्रवेश महितीपत्रकात नमूद केले आहेत. नवीन विद्यार्थ्यांना इंडकशनच्या प्रक्रियेदरम्यान या विषयाची सर्व माहिती व प्रक्रिया समजवून सांगण्यात आलेली आहे. आमच्या संस्थेच्या आवारात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी महाविद्यालय घेत आहे. संस्थेच्या इतिहासात अशी तक्रार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे व या तक्रारीची सखोल अंतर्गत तपासणी संस्था करीत आहे, असंही महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.