रेल्वेच्या दोन महिला कर्मचाऱ्यांची मदत

मध्य रेल्वेच्या लोकलमधून दिवा-कळवा स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या आणि त्यामुळे असह्य़ झालेल्या महिलेने मदतीसाठी याचना सुरू केली.. त्याच वेळी कळवा स्थानकावर दोन महिलांनी तिच्या मदतीसाठी धाव घेऊन तिची प्रसूती सुखरूप केली. या दोन्ही महिला रेल्वे कर्मचारी आहेत.

दिवा येथील मिलिंदनगर परिसरात अर्चना जाधव (२३) यांनी कामानिमित्त कळव्यात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता दिवा स्थानकातून लोकल पकडली. दिवा-कळवा प्रवासादरम्यान तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. या वेदनांमुळे ती असह्य़ झाल्याने तिने मदतीसाठी याचना केली. त्या वेळी महिला प्रवाशांनी तिला कळवा स्थानकात उतरविले आणि काही प्रवाशांनी ही माहिती स्थानक मास्तरांना दिली.

त्यानंतर स्थानक मास्तरांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना तिच्या मदतीसाठी तात्काळ पाठविले. क्षणाचाही विलंब न लावता मदिना खान आणि पिंकी सोहल या महिला कर्मचारी तिच्या मदतीसाठी धावल्या. तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण तिच्या वेदना वाढू लागल्या.

त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रवासी महिलांना तिच्याभोवती गोलाकार उभे राहण्यास सांगितले आणि त्यानंतर तिने तिथेच बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर ती महिला आणि तिचे बाळ असे दोघेही सुखरूप होते.

स्थानक मास्तरांनी रुग्णवाहिकेला पाचरण केले आणि त्यामधून तिला कळवा रुग्णालयात हलविण्यात आले. मदिना खान ही वरिष्ठ सफाई कामगार पदावर तर पिंकी सोहल ही हेड बुकिंग क्लार्क पदावर काम करते.