रिक्षामध्ये महिलांसोबत छेडछाड होण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांसोबतच शहरात रिक्षा चालक महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. या घटनांमुळे उपजिविकेसाठी ज्या महिला रिक्षा चालवतात त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासादरम्यान महिलांसोबत घडणाऱ्या घटना रिक्षा चालविणाऱ्या महिलांसोबतही घडू शकतात, यासाठी रिक्षातील जीपीएस सिस्टीम पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडली जावी, अशी मागणी महिला रिक्षा चालकांनी केली. ठाणे शहरात प्रवासाची अनेक साधने असली तरी ठाणे परिवहनच्या संथ कारभारामुळे रिक्षा हे प्रवासाचे महत्त्वाचे साखधन आहे. ठाण्यात काही महिन्यांपूर्वी महिला प्रवाशांसोबत घडलेल्या घटनांमुळे सद्यपरिस्थितीला रिक्षाने प्रवास करणे म्हणजे महिलांसाठी चिंतेचा विषय आहे. स्वप्नाली लाड या मुलीला चालत्या रिक्षातून फेकण्यात आले होते ही घटना कापूरबावडी या ठिकणी घडली होती त्यातून स्वप्नाली कसबसी बचावली होती. त्यानंतर रत्नागिरीवरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींना एक रिक्षचालक पळवून घेऊन चालला होता. त्यावेळी नितीन पुलाजवळ या मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती. या सर्व घटना ताज्या असतानाच रिक्षाचालक आणि त्याच्या सहकाऱ्याने एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या नराधमांनी तिला रिक्षातून बाहेर फेकले. सुदैवाने ती यातून बचावली. ठाण्यात सलग घटलेल्या घटनांमुळे ठाण्यातील महिला प्रवाशांसह रिक्षा चालक महिलांनी देखील भीतीचे वातावर आहे.

त्यात प्रामुख्याने ज्या महिला आपली उपजीविका चालवण्यासाठी गुलाबी रिक्षा चालवतात त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आम्ही एकट्या असतो आणि मागे तीन प्रवाशी बसलेले असतात ते कोण-कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हे कोणीच ओळखू शकत नाही. काहीवेळा लांब पल्ल्याची भाडी देखील मिळतात. रिक्षात बसलेला प्रवाशाची नियत फिरली तर आमचे काय होणार? हा गहण प्रश्न या महिलांना पडलाय. सुरक्षिततेच्यादृष्टीने या महिलांच्या रिक्षात जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली. ती आरटीओ विभागाशी जोडली गेली आहे. परंतु ज्या प्रकारे या घटना वाढत आहेत. त्यामुळे जीपीएस सिस्टीम ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यामुळे आम्ही नेहमी पोलिसांच्या छत्रछायेखाली राहू, असे महिलांना वाटते. त्याचबरोबर आम्हाला पुरुष रिक्षाचालकांचा ही मोठा त्रास आहे, ते नेहमीच आमच्याशी उद्धट बोलतात, कट मारून जातात, रिक्षा अंगावर घालतात त्यांच्यावर ही आळा बसेस, अशी व्यथा देखील रिक्षा चालक महिलांनी यावेळी मांडली. वाहतूक विभाग महिलांच्या या मागणीवर सकारात्मक विचार करत आहे. तांत्रिक बाबींना विचारात घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती ठाणे वाहतूक विभाग उपायुक्त संदीप पाळवे यांनी दिली.