नवऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी सत्र न्यायालयाने विरार येथे रहाणाऱ्या महिलेला सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१६ साली माया गुप्ताचा नवरा संतोष कुमारने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सत्र न्यायालयाने मायाला दोषी ठरवून सहावर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. संतोषकुमारच्या आईने मायाविरोधात तक्रार दाखल केली होती.

माया नवऱ्यासोबत रहात नव्हती. ती नवऱ्याला म्हणजे संतोष कुमारला प्रियकरासोबत काढलेले फोटो पाठवून त्रास देत होती असा आरोप संतोषच्या आईने केला होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने माया आणि संतोषचा विवाह झाला होता. पण मायाचे बाहेर प्रियकरासोबत प्रेम प्रकरण सुरुच होते. जेव्हा संतोष कुमारला याबद्दल समजले तेव्हा त्याने मायाला जाब विचारला. मायाने आपले बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे मान्य केले पण तिने हे नाते संपवण्यास नकार दिला.

प्रियकरासाठी तिने नवऱ्याचे घर सोडले व ती आई-वडिलांकडे निघून गेली. त्यानंतर ती संतोष कुमारला प्रियकरासोबत काढलेले फोटो पाठवून त्रास देऊ लागली. तिने संतोष कुमारकडे पैशांची मागणी सुरु केली. मागतिलेली रक्कम मिळाली नाही तर आयुष्य खराब करुन टाकीन अशी तिने धमकी दिली होती. अखेर मायाच्या या त्रासाला कंटाळून संतोष कुमारने आत्महत्या केली. आपला मुलगा नैराश्यामध्ये होता. त्याने माया बरोबर पुन्हा संसार थाटण्याचा प्रयत्न केला पण त्याला मारहाण करण्यात आली असे संतोषच्या आईने कोर्टात सांगितले.