कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका वीस वर्षीय महिलेने शनिवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकात एका बाळाला जन्म दिला. रेल्वेत प्रवासादरम्यान तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला स्थानकातील रेल्वेकडून राबवण्यात येणार्या ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिची सुखरुप प्रसुती करण्यात आली. रेल्वेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय एक गर्भवती महिला कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना तिला अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. याची माहिती या महिलेने रेल्वे कर्मचाऱ्याला दिली. त्यानंतर ठाणे स्टेशनवर तिला उतरवण्यात आलं आणि त्यानंतर रेल्वे स्थानकातील ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये तिची प्रसुती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला.

ठाणे स्टेशनवर ‘वन रुपी क्लिनिक’ चालवले जात आहे. या क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनीच या महिलेची सुखरुप प्रसुती केली. प्रसुतीनंतर जन्मलेले बाळाची प्रकृती उत्तम आहे. प्रसुतीनंतर संबंधीत महिलेच्या नातेवाईंकाशी संपर्क साधण्यात आला त्यानंतर तिला या क्लिनिकमधून त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

रेल्वेत अनेकदा प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेने कायमच सकारात्मक काम केले आहे. रेल्वेच्या या ‘वन रुपी क्लिनिक’चेही प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे.