24 January 2020

News Flash

डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या

एका पिंपात हात-पाय-शीर कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाला होता.

संग्रहित छायाचित्र

ठाणे : पत्नी डान्स बारमध्ये काम करते म्हणून तिचा खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी हात-पाय-शीर धडापासून वेगळे करणाऱ्या हमीद सरदार याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी पश्चिम बंगालमधून अटक केली.

हमीद याला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत. भिवंडी येथील सोनाळे गाव परिसरात १३ एप्रिलला एका पिंपात हात-पाय-शीर कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान ज्या ड्रममध्ये हा मृतदेह पोलिसांना मिळाला त्या ड्रमवरील बॅचची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी तपासले. त्यावेळी हा पिंप भिवंडी येथील भैरव सिन्थेटीक या दुकानातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस भैरव सिन्थेटीक या दुकानात गेले असता, त्यांनी हा ड्रम एका भंगार विक्रेत्याला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भंगार विक्रेत्याचा शोध काढून त्याची चौकशी केली असता, त्याने हा पिंप एका व्यक्तीला विकल्याची माहिती दिली. यानंतर या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात आले. त्यावेळी एक व्यक्ती पिंप एका रिक्षातून घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे, रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर या रिक्षा चालकाने पिंप नेलेल्या घराचा पत्ता दाखविला. ते घर हमीद सरदार याचे होते. मात्र, तो पश्चिम बंगालला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे सापळा रचून हमीदला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, पत्नी सबीबा ही डान्स बारमध्ये जात असल्याने तिचा खून केल्याची कबूली त्याने दिली. सबीना ही घरात झोपलेली असताना तिचे तोंड दाबून त्याने खून केला होता. ओळख पटू नये म्हणून हमीदने तिचे शीर, पाय, हात हे धडा वेगळे केले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

First Published on April 24, 2019 2:45 am

Web Title: woman working in the dance bar murder by husband
Next Stories
1 मॉडेलिंगसाठी इच्छुक तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार, भाईंदरमधील घटना
2 ना प्रचाराचा पत्ता, ना उमेदवारांची माहिती!
3 वागळेतील उद्योगांवर पाणीसंकट
Just Now!
X