16 October 2019

News Flash

सोनसाखळी चोरीत महिलादेखील सक्रिय

मीरा रोड येथे घेडलेल्या सोनसाखळी चोरीच्या तीन प्रकरणात महिलादेखील सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मीरा रोडमधील तीन प्रकरणात महिलेचा समावेश

भाईंदर : सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांमध्ये आतापर्यंत बेरोजगार अथवा व्यसनाधीन तरुणांचा सहभाग असल्याचे दिसून येत होते. परंतु मीरा रोड येथे घेडलेल्या सोनसाखळी चोरीच्या तीन प्रकरणात महिलादेखील सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.

मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरात रहाणाऱ्या जेस्सी या मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करतात. रात्री नऊच्या सुमारास त्या कामावरून आपल्या घरी जात असताना राहत्या इमारतीजवळच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील तरुणाने खेचून पळ काढला. यावेळी दुचाकीस्वारासोबत एक तरुणीदेखील असल्याची तक्रार जेस्सी यांनी मीरा रोड पोलिसांकडे केली आहे. यावेळी सोनसाखळी चोरीची तक्रार देण्यासाठी आणखी एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आली होती. जेस्सी यांची सोनसाखळी  चोरल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मेरी गोल्ड परिसरात प्रभाकर भोईर यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आली आणि या प्रकरणातही तोच दुचाकीस्वार आणि महिला असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

या घटनेच्या काही दिवस आधी दीपक रुग्णालय परिसरात भाजी बाजारात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रकार झाला. या घटनेतही काळ्या रंगाचीच दुचाकी होती आणि दुचाकीस्वारासोबत तोंडावर पांढऱ्या रंगाची ओढणी गुंडाळलेली महिला असल्याचे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये आता महिलादेखील सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on April 23, 2019 2:29 am

Web Title: women also activate in chain snatching case