ठाण्यातील तीन हात नाका परिसरात बुधवारी रात्री मोबाईल खेचणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करताना रिक्षातून खाली पडून एका २७ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चोरटे मोबाईल घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना जेरबंद केले. कन्मीला रायसिंग (२७) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी भिवंडी भागातील रहिवासी आहेत.

चोरट्यांनी हातातला मोबाईल खेचला आणि…

मुंबई येथील कलीना भागात कन्मीला रायसिंग या राहतात. त्या ठाण्यातील विवियाना मॉलमधील एका शॉपमध्ये काम करत होत्या. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्या मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी मॉलजवळील रिक्षा थांब्यावरून रिक्षा पकडली. रिक्षा तीन हात नाका येथे आली असता, मागून दुचाकीवर येणाऱ्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल खेचला. चोरट्यांसोबत प्रतिकार करताना तोल जाऊन त्या रिक्षातून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मैत्रिणीने त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळव्यामध्येही घडली होती अशीच घटना!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ पथके तयार केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाईल कॉलचा तपशील तसेच खबऱ्यंमार्फत माहिती मिळवून पोलिसांनी अल्केश आणि सोहेल या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. काही दिवसांपूर्वीच कळवा येथे एका महिलेचा मोबाईल चोरट्यांसोबत प्रतिकार करताना रेल्वेतून तोल जाऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडली आहे.