महिलांना पुरुष चालक असलेल्या रिक्षातून प्रवास करताना कुचंबणा सहन करावी लागत होती. ठाणे शहरात पुरुष रिक्षाचालकांकडून महिलांना असभ्य वागणूक दिल्या गेल्याच्या काही घटना घडल्या होत्या. याविषयी अपराधाच्या घटना घडू लागल्या होत्या. हे वास्तव लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून महिला रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी अबोली रिक्षा योजना आखली गेली होती. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी अनेक महिला उत्सुक असल्या तरी त्यांच्यासमोर आदर्श नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या परिस्थितीत ठाण्यातील अनामिका भालेराव यांनी महिला सुरक्षेसाठी रिक्षाचालक म्हणून कार्यरत होण्याचा निर्णय घेतला. मागील आठवडय़ामध्ये त्यांची आबोली रिक्षा पहिल्यांदा ठाण्याच्या रस्त्यांवरून धावली. विशेष म्हणजे वृत्तपत्र, प्रथमोपचार साहित्य, पंखा, मोबाईल चार्जिग, वाफाळता चहा आणि वायफाय कोणत्याही चांगल्या दर्जाच्या उपाहारगृहात दिल्या जाणाऱ्या सुविधा त्यांनी या रिक्षात उपलब्ध करून दिल्या. पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या हस्ते या रिक्षाचे उद्घाटन झाले. कुटुंबाच्या साथीने या महिलेने सुरू केलेला हा व्यवसाय अनेक नोकरदार महिलांना कामावर सोडण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. महिला सुरक्षेसाठी रिक्षाचालक झालेल्या ठाण्यातील अनामिका भालेराव यांची ही तीन चाकांवरील दिनचर्या..