नालासोपाऱ्यात रिक्षा थांब्यांवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

नालासोपाऱ्यात रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याच्या घटनेनंतर याठिकाणी महिलांची छेड काढली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे वसई—विरारमधील सर्व रिक्षाथांबे आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महिला वर्गातून जोर धरू लागली आहे.

नालासोपारात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण केली होती. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाला तसेच ज्येष्ठ नागरिकालाही रिक्षाचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर बेकायाद रिक्षांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करण्यरयत रिक्षाचालकांची मजल गेली. या पाश्र्वभूमीवर महिलांची सुरक्षा आणि रिक्षाचालकांमधील गुंडप्रवत्तीला वेसण घालण्यासाठी सर्व रिक्षा थांब्यांवर सीसीटीव्ही बसवून पोलीस बीट उभारण्याची मागणी पुढे येत आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे  गाऱ्हाणे मांडले.

नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर दोन्ही बाजूस रिक्षाचालकांची दादागिरी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सामान्य नागरिक वा सामान्य प्रवासीच नव्हे तर अधिकृत रिक्षाचालकांनाही अनधिकृत रिक्षाचालक दादागिरी करतात. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रिक्षा थांबे व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवून पोलीस बीट उभारणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात गृहिणी प्रभा कुर्वे यांनी व्यक्त केली. दुपारी शाळेत एकटय़ा-दुकटय़ा ये-जा करणाऱ्या लहान विद्यार्थिनीं तसेच रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, असे मत नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी व्यक्त केले.

दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर आम्ही कारवाई करत आहोत. आतापर्यंत १२ रिक्षाचालकांवर दखलपात्र स्वरुपाचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. उर्वरीत प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.          – वसंत लब्धे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा