27 May 2020

News Flash

ग्रामीण भागातील महिलांना मास्कमधून रोजगार

टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थार्जन

टाळेबंदीच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थार्जन; ५१ हजार मास्कच्या निर्मितीतून सात लाखांचा नफा

ठाणे : करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे ९५ महिला बचत गटांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गेल्या दोन आठवडय़ांपासून ५१ हजार ४०० मास्कची निर्मिती केली आहे. या सर्व मास्कच्या विक्रीतून बचत गटांना ७ लाख २३ हजार ६०० रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एकीकडे करोनामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडली असताना करोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्कमुळे या महिलांना रोजगार मिळाला आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संसर्गापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात मास्कच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरात मास्कचा तुटवडा जाणवू लागला असून मास्कच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या जीवन उन्नती अभियानाद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मास्क निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे आणि प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी केले. त्यामुळे जिल्ह्य़ातील भिवंडी,  शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांच्या ग्रामीण भागातील सुमारे ९५ बचत गटांनी मास्क निर्मितीच्या कामासाठी पुढाकार घेतला असून त्या गटांमध्ये १ हजार ५०० विधवा, आदिवासी आणि वंचित घटकातील महिलांचा समावेश आहे. या महिलांतर्फे साधे आणि तीन थरांच्या कॉटन मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी साध्या मास्कची किंमत १२ ते १५ रुपये तर तीन थरांच्या कॉटन मास्कची किंमत केवळ २० रुपये आहे. महिलांनी तयार केलेल्या या मास्कची किंमत कमी असल्याने त्याची मागणी वाढली असून आत्तापर्यंत या महिलांनी ५१ हजार ४०० मास्कची विक्री केली असून त्यातून बचतगटांना ७ लाख २३ हजार ६०० रुपयांचा नफा झाला आहे. सध्या टाळेबंदी असल्याने देशातील ग्रामीण भागातील रोजंदार कर्मचाऱ्यांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र, या परिस्थितीतही मास्क निर्मितीमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

मास्कचा दर्जा उत्तम असल्याने मागणी वाढली

ग्रामीण भागातील महिलांतर्फे बनविल्या जाणाऱ्या मास्कचा दर्जा अतिशय उत्तम असून हे मास्क १२ ते २० रुपये अशा नाममात्र दरात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या मास्कसाठी वापरला जाणारा कापड हा उत्तम दर्जाचा असल्याने या मास्कचा धुऊन पुनर्वापरही करता येतो. त्यामुळे या मास्कची मागणी वाढली असून ठाणे जिल्हा परिषदेतर्फेच या मास्कची विक्री जिल्ह्य़ातील विविध स्वयंसेवी संस्था आणि खासगी आस्थापनांना करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ७७५५९६६९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:32 am

Web Title: women from rural maharashtra got an opportunity to earn money by producing masks zws 70
Next Stories
1 मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांचा तुटवडा
2 CoronaVirus : करोनाबाधितांसाठी रुग्णवाहिका मिळेना!
3 CoronaVirus : वसई-विरारमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ
Just Now!
X