सुट्टीनिमित्त डोंबिवलीतील अनेक रहिवासी गावी गेले आहेत. या कालावधीत सर्वाधिक घरफोडय़ा होतात. त्यामुळे गावी गेलेल्या रहिवाशांना मजेत सुट्टी उपभोगता यावी, त्यांचे शहरातील घर सुरक्षित राहावे, म्हणून ईगल ब्रिगेडमध्ये पुरुषांबरोबर महिलांचे स्वतंत्र गस्तीपथक कार्यरत झाले आहे.

गेल्या महिन्यापासून ईगल ब्रिगेडमधील पुरुष मंडळी रात्रीच्या वेळेत डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात विविध भागांत भ्रमंती करून, गस्त घालत आहेत. त्यांना रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. काही उत्साही स्त्रियांनी ईगल ब्रिगेडच्या रात्रीच्या गस्तीपथकात काम करण्याची तयारी दर्शविली. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इंद्रजित कार्ले यांनीही या महिलांच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांच्या पथकात पोलीस मित्र ज्योती वारुडे, तृप्ती मयेकर, नमिता दोंदे, स्वाती कुलकर्णी, महालक्ष्मी अय्यर, सुप्रिया झेंडे व अन्य स्त्रियांचा सहभाग आहे. महिलांच्या गस्तीपथकाबरोबर ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर, विकास थोरात, स्वप्निल चौघुले हेही उपस्थित असतात. रात्री साडेदहा वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत विष्णुनगर भागातील विविध सोसायटय़ांमध्ये जाऊन तेथील रखवालदार, गुरख्याशी संपर्क करणे, कोणी संशयास्पद व्यक्ती आढळली तर त्याची तातडीने पोलीस ठाण्याला माहिती देणे अशी कामे महिला पथकाने सुरू केली आहेत.