|| भगवान मंडलिक

महिला बचतगटांकडून दोन हजार आकाशकंदिलांची निर्मिती; रोजगाराचा अंधार दूर

कल्याण : जव्हार तालुक्यातील १० आदिवासी पाड्यांमधील महिलांनी बांबूपासून सुरेख आकाशकंदील तयार केले असून मुंबई, ठाणे परिसरातील बाजारपेठांसह ऑनलाइन विक्रीसाठी ते उपलब्ध आहेत. आदिवासी महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून या कंदिलांची निर्मिती केली असून तब्बल दोन हजार कंदील तयार करण्यात आले आहेत. या कंदिलाच्या निर्मितीमुळे करोनाकाळात आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर दैनंदिन रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील आदिवासी महिला मजुरी करून कुटुंबाची गुजराण करत आहेत. या महिलांना गावातच राहून कसे स्वयंपूर्ण करता येईल यासाठी भाईंदर-उत्तन येथील केशवसृष्टी संस्थेच्या ग्रामविकास योजना उपक्रमातून विविध उपक्रम राबवले जात आहे. या संस्थेने आदिवासी भागातील महिलांचे बचतगट स्थापन केले आहेत. या भागातील महिला बांबूपासून  विविध वस्तू तयार करतात. त्यामुळे या भागांमध्ये संस्थेच्या माध्यमातून पावसाळ्यात दरवर्षी बांबूची लागवड केली जात असून आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक बांबू रोपांची लागवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या मदतीने गेल्या दोन महिन्यांपासून महिलांनी बांबूपासून आकाशकंदील तयार करण्याचे काम सुरू केले होते. कपडा आणि बांबूच्या काड्यांपासून १० पाड्यांतील आदिवासी महिलांनी विविध आकाराचे सुरेख दोन हजार आकाशकंदील तयार केले आहेत. हे कंदील सध्या मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. ४०० रुपये किमतीपासून सुरू होणारे हे पर्यावरणपूरक कंदील अतिशय आकर्षक असून दिवाळीच्या सणानंतरही घरातील सजावटीसाठी वापरता येतात. या कंदिलांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महिला बचतगटांना देण्यात येत आहे. त्यामुळे करोनाकाळात या महिलांच्या रोजगाराचा अंधार दूर झाला आहे. हे कंदील घरपोच मिळवण्यासाठी‘प्रोजेक्टग्रीनगोल्ड.कॉम’ येथे किंवा ९८२१३४३१२५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केशवसृष्टी संस्थेने केले आहे.