04 August 2020

News Flash

महिलांच्या मनात असुरक्षिततेचे ‘ठाणे’!

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकात महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकात महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

स्थानकात मद्यपी, गर्दुल्ल्यांचा खुलेआम वावर ;  महिला प्रवाशांची छेडछाड, अंगविक्षेपाच्या प्रकारांत वाढ

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या अशा ठाणे स्थानकातून प्रवास करणे महिलावर्गाला आता जिकिरीचे वाटू लागले आहे. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मद्यपी, गर्दुल्ले तसेच भिकाऱ्यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला असून त्यांच्याकडून महिला प्रवाशांना उपद्रव होण्याच्या घटना वाढत आहेत. धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात शिरून अंगविक्षेप करणे, फलाटावर महिला प्रवाशांच्या जवळ जाऊन शिविगाळ करणे, रात्री एकटय़ादुकटय़ा महिलेचा पाठलाग करून तिला घाबरवणे असे गंभीर प्रकार या स्थानकात नित्याचे बनले असल्याच्या तक्रारी अनेक महिला प्रवाशांनी ‘लोकसत्ता’कडे केल्या. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात येणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल वा रेल्वे पोलिसांचे कर्मचारी रात्री आठनंतर स्थानकातून गायब होत असल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकात महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महत्त्वाच्या स्थानकांत सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे स्थानकातील रेल्वे फलाटांवर याच्या अगदी विरुद्ध चित्र दिसत आहे. रात्री आठनंतर स्थानकांमधील फलाटांवरील सुरक्षा दलाचे जवान, रेल्वे पोलीस गायब होत असून भिकारी, गर्दुल्ले, मद्यपी यांचे राज्य सुरू होत असल्यासारखे चित्र आहे. महिला डब्यासमोर योत अश्लील चाळे करणाऱ्या गद्दुल्ल्यांना आवरायचे कुणी, असा सवाल प्रवासी विचारत आहे.

हेल्पलाइन नादुरुस्त, पोलिसांचे दुर्लक्ष

ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेली अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असून प्रवाशांनी मदतीसाठी संपर्क केल्यानंतर पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असा अनुभव अनेकांना येत आहे. हेल्पलाइनवरही काहीच संपर्क होत नसल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. महिला प्रवाशांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेत कायदा हाती घ्यावा का, असा सवाल महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यासंदर्भात ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश नायर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसून यासंबंधी वरिष्ठांना प्रश्न विचारा, असे त्यांनी सांगितले.

चालत्या ट्रेनमधून पाय बाहेर काढून स्टंटबाजी करणे, महिलांना धक्के मारणे यांसारखे अनेक प्रकार वारंवार होत असतात. वरकरणी या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; परंतु महिलांना याचा मनस्ताप होतो. अशा लहानसहान प्रकारांची तक्रार घेण्यास पोलीसही टाळाटाळ करतात. 

– प्रियांका कदम, ठाणे

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताच फलाट क्रमांक एकपासूनच गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा वावर आढळतो. प्रत्येक फलाटावर गर्दुल्ले आणि भिकारी आढळतातच. यातील काही जण वेडय़ाचे सोंग करून अश्लील हावभाव आणि अर्वाच्य शिवीगाळ करत असतात. अशा वेळी महिला प्रवाशांना मान खाली करून तेथून प्रवास करावा लागतो. 

– स्वरा घाग, ठाणे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 2:44 am

Web Title: women passengers feel insecure on thane railway station
Next Stories
1 नवाकोरा पूल कमकुवत
2 पाऊले चालती.. : निवांत फेरफटका
3 पाच कोटी भरा!
Just Now!
X