मुंबईतील न्यू चर्नी रोड येथील के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयात चौदा वर्ष लिपीक म्हणून काम केलेल्या उषा आठल्ये या महिलेच्या निवृत्ती वेतनाची फाइल शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी चार वर्षांपासून रोखून धरली आहे. पदवीधर असलेल्या या महिलेने निवृत्ती वेतन सुरू व्हावे म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन, शिक्षणमंत्री, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयाचे दरवाजे उंबरठे झिजवले. पण कुणीही तिला दाद देत नाही. त्यामुळे अखेर आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असे डोंबिवलीकर रहिवासी असलेल्या उषा आठल्ये (६२) यांनी सांगितले.
हिंदुजा महाविद्यालयात उषा आठल्ये यांची अनुकंपा तत्वावर लिपीक/टंकलेखक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी महाविद्यालयाने नियुक्तीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, टंकलेखनाच्या तीस व चाळीस शब्द गतीच्या परीक्षा उत्तीर्ण, अशी शैक्षणिक पात्रता दिली होती. आठल्ये यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन महाविद्यालयाने त्यांना २००४ मध्ये सेवेत कायम केले. उषा आठल्ये यांचे शालेय शिक्षण जुनी सातवीपर्यंत झाले आहे. त्यांनी महिला विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने बी. ए. बी. एड्.पर्यंतचे शिक्षण १९८५ मध्ये पूर्ण केले आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावी झाले नाहीत. त्यांना महिला विद्यापीठात प्रवेश पात्रतेची परीक्षा देऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येते. याच पद्धतीतून दहावी प्रमाणपत्र नसताना आठल्ये यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवीची शैक्षणिक पात्रता गृहित धरून महाविद्यालयाने आपली नेमणूक केली होती, असे आठल्ये यांनी सांगितले.
आठल्ये यांच्या निवृत्त होण्याला दहा महिने बाकी असताना, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांकडून हिंदुजा महाविद्यालयाला  उषा आठल्ये यांचे दहावीचे प्रमाणपत्र पाठवा. त्याशिवाय वेतन निश्चिती करता येणार नाही, असे कळवले. आपली नियुक्ती महाविद्यालयाने पदवी प्रमाणपत्राच्या आधारे केली आहे.
त्यावेळी दहावी उत्तीर्ण अशी कोणतीही सक्ती नव्हती. आपली वेतन निश्चिती केवळ दहावी प्रमाणपत्रामुळे रखडणार आहे, असे कळले असते तरी ते शिक्षण आपण पूर्ण केले असते. दहावी प्रमाणपत्र नाही म्हणून आपले निवृत्ती वेतन रोखू नये, असे आठल्ये यांनी सहसंचालक, महाविद्यालय प्राचार्याना कळवले आहे.  
‘आपले वय झाले आहे. आपणास प्रवास झेपत नाही, अशी आर्जवे करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक कार्यालय यांचे उंबरठे झिजवत आहोत. कोणीही तेथे विचारत नाही. उलट प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यावर उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यावर आम्हाला वेळ नाही’ अशी उत्तरे शिक्षणमंत्री, उच्च शिक्षण विभागातील सहसंचालकांच्या कार्यालयातून देण्यात येत आहेत, असे आठल्ये यांनी सांगितले.