करोनाच्या टाळेबंदीतही कंपन्यांचा हप्त्यासाठी तगादा

वसई : करोना आणि त्यामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे वसई-विरारमधील महिला रिक्षाचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दीड वर्षांपूर्वी महिला बचत गटमार्फत अनेक महिलांना रिक्षा मिळवून दिल्या होत्या. मात्र आता व्यवसाय होत नसून दुसरीकडे कंपन्यांनी त्यांच्याकडे रिक्षाचे मासिक हप्ते भरण्याचा तगादा लावला आहे.

करोनाचे संकट, टाळेबंदी यांचा फटका रिक्षाचालकांना बसला आहे. मात्र त्यातही महिला रिक्षाचालक सर्वाधिक भरडल्या गेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी वसईतील समृद्धी महिला बचत गटाने ३५ महिलांना कर्जावर रिक्षा उपलब्ध करून दिल्या होत्या. या सर्व महिला गरीब आणि मध्यमवर्गीय घरातील होत्या.

रिक्षाचे हप्ते जाऊन त्यांना आर्थिक उत्पन्न होत होते. मात्र करोनामुळे मार्च महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि रिक्षांचा व्यवसायच बंद पडला. आता काही प्रमाणात टाळेबंदी शिथिल झाली असली तरी ट्रेन बंद असल्याने रिक्षांचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे या महिलांना कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न पडला आहे. वसई-विरार शहरात १००हून अधिक महिला रिक्षाचालक आहे. या सर्व महिला रिक्षाचालकांना हीच समस्या भेडसावत आहे.

‘आम्हाला कंपनीने रिक्षा दिली त्याचा मासिक हप्ता साडेपाच हजार रुपयांचा आहे. मात्र आता व्यवसाय होत नसल्याने आम्ही हे हप्ते कसे भरायचे?’ असा सवाल नालासोपारा येथील महिला रिक्षाचालक ऋतिका वेंगुर्लेकर हिने केला आहे. आता कंपन्या हप्ते द्या म्हणून मागे तगादा लावत असल्याने महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. वसईत राहणाऱ्या एका महिलेने आपली रिक्षा चालविण्यासाठी एका माणसाला दिली होती. मात्र ती व्यक्ती रिक्षा घेऊन पसार झाला आहे. त्याने दिलेली कागदपत्रेदेखील बनावट निघाली आहेत.

‘आम्ही महिलांना स्वावलंबी होण्यासाठी रिक्षा मिळवून दिल्या तसेच त्यांना सर्व प्रशिक्षण मोफत दिले. मात्र आता धंदा होत नसल्याने या महिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे,’ असे समृद्धी महिला बचत गटाच्या प्रमुख किरण बडे यांनी सांगितले. कंपन्या या महिलांकडे पूर्ण हप्ते भरता येत नसतील तर किमान अर्धी रक्कम भरण्यास सांगत आहेत. मात्र तेदेखील या महिलांना शक्य नाही.

‘वसई-विरारमधील महिला आणि पुरुष आदी सर्व रिक्षाचालकांची बिकट अवस्था झालेली आहे. पुढील काळातही हे संकट लवकर दूर होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे किमान कंपन्यांनी त्यांच्याकडून हप्ते घेऊ नये,’ अशी मागणी पालघर जिल्हा रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी केली आहे.