31 May 2020

News Flash

‘पिंक अर्बन’ प्रसाधनगृह वर्षभरापासून बंद

ठाणे शहरात कोटय़वधी रुपये खर्च करून विविध अत्याधुनिक प्रकल्प महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत.

 

|| आशिष धनगर

शहरात महिला स्वच्छतागृहांची वानवा:- ठाणे महापालिका हद्दीत गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ‘पिंक अर्बन’ प्रसाधनगृह तसेच विश्रांतीगृह गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याने मोठा गाजावाजा करत महापालिकेने आखलेली ही योजना फसल्याचे चित्र पुढे आले आहे. शहरातील विविध भागांत महिलांसाठी अशी स्वच्छतागृह उभारली जातील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे देखील सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने महिला वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठाणे शहरात कोटय़वधी रुपये खर्च करून विविध अत्याधुनिक प्रकल्प महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत. यापैकी काही प्रकल्पांची अंमलबजावणी मात्र पुरेशा गतीने होत नाही, असेच चित्र आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी उभारण्यात आलेले टेक बीन प्रकल्पाची दुरवस्था झाल्याचे मध्यंतरी पहायला मिळाले होते. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांच्या विकासासाठी विशेष तरतूद असावी असा प्रयत्न गेल्या चार वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला होता. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे कमी असल्याने गर्दीच्या ठिकाणी अशी विशेष स्वच्छतागृह आणि विश्रांती कक्ष सुरू करण्याचे महापालिकेतर्फे ठरविण्यात आले होते. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी पिंक अर्बन नाव असलेले ही विशेष प्रसाधनगृहे ठाणे शहरात उभारण्यात आली होती. या प्रसाधनगृहांमध्ये शौचालय, स्तनपान कक्ष, सॅनटरी नॅपकीन, वेंडिग मशिन, चेंजिंग कक्ष आणि एटीएम मशीन यांसारख्या सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्या होत्या. ठाण्यात कोपरी पूर्व, सॅटीस पूल, चेंदणी कोळीवाडा, कळवा स्थानक परिसर, कळवा नाका, कासारवडवली पोलीस स्टेशन, वाघबीळ नाका, मानपाडा, कापुरबावडी, कोलशेत विसर्जन घाट, गावदेवी मैदान, तीन हात नाका या भागात पिंक अर्बन ही विशेष प्रसाधनगृहे उभारण्यात आले होते. मात्र, बराच पैसा खर्च करून उभारण्यात आलेली ही सर्व पिंक अर्बन स्वच्छतागृहे वर्षभरापासून बंद असल्याचे पाहायला मिळत आहेत.

गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेली ही सर्व प्रसाधनगृहे बंद असल्याने महिलांची मोठी कुचंबना होत असून महिलांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच ही प्रसाधनगृहे सुरू करण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत सविस्तर माहिती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ठाणे शहरात महिलांसाठी प्रसाधनगृहांची संख्या कमी असल्याने गर्दीच्या ठिकाणी महापालिका परिवहनच्या जुन्या बस गाडय़ांमध्ये महिलांसाठी प्रसाधनगृहे तयार करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला होता. महापालिका आयुक्तांनी बैठकीत या निर्णयाची घोषणा केली होती. मात्र, काही काळाने वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्याचे ठरले.

ठाणे शहरात महिलांसाठी आधीच प्रसाधनगृहे कमी असून जी प्रसाधनगृहे आहेत, तीदेखील अस्वच्छ असतात. महापालिकेतर्फे उभारण्यात आलेली ‘पिंक अर्बन’ प्रसाधनगृहे ही फायदेशीर ठरत होती. मात्र, वर्षभरापासून ही प्रसाधनगृहे बंद असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. -सोनल सुर्वे, विद्यार्थिनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 1:51 am

Web Title: women sanitary houses city akp 94
Next Stories
1 रेल्वे स्थानकांतील तपासणी यंत्रे नावापुरती
2 डोंबिवलीकर गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड
3 जिल्ह्य़ातील २६ हजार हेक्टर भातपीक पाण्यात
Just Now!
X