देशभरात लहान मुले, तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतात. बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतेकांचे अपहरण करण्यात आलेले असते. लहान मुलांचे भीक मागायला लावण्यासाठी तर तरुणी व महिलांचे वेश्या व्यवसायासाठी अपहरण केले जाते असे वास्तव पोलिसांच्या यापूर्वीच्या तपासातून पुढे आले आहे. तसेच पोलिसांच्या तपासामुळे बेपत्ता झालेली लहान मुले, तरुणी आणि महिला पुन्हा घरी सुखरूप परतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडली. नोकरीला लावण्याची बतावणी करत पीडित महिलेला गुजरातमध्ये नेऊन विकले आणि विकत घेणाऱ्याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले. मात्र, पोलिसांच्या कामगिरीमुळे ती त्याच्या तावडीतून सुटली. त्याच घटनेची ही सविस्तर कथा..

उल्हासनगर परिसरात तीस वर्षांची सुमन (नाव बदललेले आहे) राहते. बारा-तेरा वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. तिला तीन मुले आहेत. काही कारणावरून पतीचे तिच्यासोबत खटके उडाले आणि त्यातूनच तीन वर्षांपूर्वी तो तिला सोडून निघून गेला. तेव्हापासून ती एकटीच तिन्ही मुलांचा सांभाळ करते. उल्हानगर परिसरातच तिचा भाऊ रमेश (नाव बदललेले आहे) राहत असून त्याचा तिला काहीसा आधार मिळतो. शर्टाना काच-बटण लावण्याची कामे करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मात्र, या कामातून तिला फारसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न तिच्यापुढे असायचा. याच आर्थिक चणचणीमुळे ती नोकरीच्या शोधात होती. मात्र सर्वत्र शोध घेऊनही तिला नोकरी मिळत नव्हती.

अशानेच १६ जुलै २०१६ रोजी आलेल्या एका फोननंतर दुपारी १२च्या सुमारास ती नोकरीसाठी जात आहे, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. रमेशने तिचा शोध सुरू केला. परंतु, तिचा काहीच पत्ता लागेना. अखेर त्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुमन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज आणि सहायक पोलीस आयुक्त विलास तोतावार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने सखोल तपास सुरू केला. या तपासासाठी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. आहेर, पोलीस कर्मचारी आर. ए. नाडेकर, सुजीत नचिते, रवींद्र बागुल, सोमनाथ पवार, भरत पवार, काझी, सलीम तडवी महिला पोलीस कर्मचारी बागुल, मनीषा दामोदर यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सुमनकडे असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास सुरू केला. मोबाइलच्या लोकेशननुसार ती गुजरातमधील खरालु नावाच्या गावात असल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने त्या दिशेने कूच केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांनी ४ ऑगस्टला गुजरातला एक पथक रवाना केले. या पथकासोबत सुमनचा भाऊ रमेश हासुद्घा गुजरातला गेला. मोबाइल लोकेशननुसार पथक रमीला पोपटलाल पटेल (५०) हिच्या घरी पोहोचले. तिला ताब्यात घेऊन पथकाने चौकशी सुरू केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उंजा या गावी जाऊन पथकाने तेथून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चंद्रिका दर्जी हिचे नाव सांगितले. त्यामुळे हे पथक पुन्हा खैरालु गावात आले आणि गावातील चंद्रिकाच्या घरी गेले. घराबाहेरच तिचा मुलगा जितेंद्र पथकाला भेटला. त्याच्याकडे पथकाने सुमनविषयी चौकशी केली. मात्र, अशा नावाची महिला इथे राहत नसल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एक महिला खाली डोकावत असून ती मदतीसाठी याचना करीत असल्याचे पथकातील एकाच्या निदर्शनास आले. ती सुमनच होती. त्यानंतर पथकाने चंद्रिका आणि जितेंद्र या दोघांना ताब्यात घेऊन सुमनची त्यांच्या तावडीतून सुटका केली. या सर्वाना उल्हानगर पोलीस ठाण्यात आणून पथकाने पुढचा तपास सुरू केला आणि त्यात घटनेचा संपूर्ण उलगडा झाला.

सुमनचे घर असलेल्या परिसरातच रंजना पाटील ऊर्फ राखी धनेश शिंदे हिची मुलगी व जावई राहतो. त्यांच्या घरी राखी अधूनमधून येत जात असे. एके दिवशी मुलीच्या घरी जात असताना तिची सुमनसोबत गाठ पडली. तेव्हापासून सुमनची तिच्यासोबत ओळख झाली होती आणि त्यानंतर त्या दोघी रस्त्यात भेटल्यावर एकमेकींसोबत बोलायच्या. एकदा अशाच एका भेटीदरम्यान नोकरीच्या शोधात असल्याचे सांगत नोकरी असेल तर सांगा, असे सुमनने तिला सांगितले होते. त्यामुळे १६ जुलैला राखीने तिला नोकरीला लावते, असे खोटे सांगून उल्हासनगर रेल्वे स्थानकात बोलावून घेतले. त्यानंतर ती तिला अंधेरी परिसरात घेऊन गेली. तिथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिला गुजरात राज्यात नेण्यात आले. याठिकाणी मामा ऊर्फ दर्जीभाई बाबाभाई रबरी (६३) याच्या ताब्यात तिला देण्यात आले आणि तिचा खोटय़ा नावाचा दाखलाही त्याच्याकडे देण्यात आला. त्यानंतर त्याने दीड लाख रुपयांत तिला विकले. या सौद्यामध्ये त्याचा साथीदार विक्रमभाई छत्रीसिंग राठोड हासुद्धा होता. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे जितेंद्रने तिला विकत घेतले होते. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. या लग्नासाठी वकील पुजाजी तालाजी ठाकूर याने त्याला मदत केली होती. ही माहिती तपासात उघड होताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

– नीलेश पानमंद