05 March 2021

News Flash

महिला विशेष लोकल वसईऐवजी विरारहूनच!

१ नोव्हेंबरपासून ही लोकल वसईऐवजी विरारहून सुटणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम रेल्वे निर्णयावर ठाम; नालासोपारा, विरारच्या प्रवाशांना फायदा होणार असल्याचे मत

वसईहून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल ट्रेन (लेडीज स्पेशल) रद्द करून ती विरार येथून सोडण्याचा निर्णयावर पश्चिम रेल्वे ठाम आहे. याबाबत रेल्वेने सर्वेक्षण केले असून वसईहून कमी प्रवासी मिळत असल्याने विरारहून लोकल सोडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. १ नोव्हेंबरपासून ही लोकल वसईऐवजी विरारहून सुटणार आहे.

वसई-विरारमधून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. मात्र विरार आणि नालासोपारा शहरातील प्रचंड लोकसंख्येमुळे विरारहून सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये वसई आणि नायगावच्या प्रवाशांना बसता येत नाही. त्यासाठी रेल्वेने वसईहून एकूण चार लोकल सुरू केल्या आहेत त्यापैकी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी महिला विशेष लोकल आहे. ही लोकल वसईहून सुटत असल्याने वसईबरोबरच नायगाव, भाईंदर आणि मीरा रोडच्या महिला प्रवाशांना मोठा फायदा मिळतो. मात्र पश्चिम रेल्वेने ही लोकल वसईहून न सोडता विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वसई आणि नायगावच्या महिला प्रवाशांनी जोरदार विरोध केला आहे.

गेल्या आठवडय़ात रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि खासदार राजेंद्र गावित यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानकांचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी ही वसईहून सकाळी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून स्थानकात सर्वेक्षण करण्यात येत होते. या सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाला असून रेल्वेने प्रवासी मिळत नाही असे विचित्र कारण देत ही लोकल वसईऐवजी विरारहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून ही लोकल वसईऐवजी विरारहून सुटणार आहे.

महिला प्रवाशांचा संताप

पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाबद्दल वसईतील महिला प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. हे सर्वेक्षण एकतर्फी झालेले आहे. नायगावमधील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलींना विचारलेले नाही. हा आमच्यावर मोठा अन्याय असल्याचे महिला प्रवासी अ‍ॅड्. मृदुला खेडेकर यांनी सांगितले. याविरोधात मंगळवारी महिला प्रवाशांचे शिष्टमंडळ मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

पश्चिम रेल्वेचे याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. नालासोपारा आणि विरारमधील महिला प्रवाशांना फायदा मिळावा म्हणून आम्ही ही लोकल वसईऐवजी विरारमधून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

– रवींद्र भाकरे, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:53 am

Web Title: women specially local from virar instead of vasai
Next Stories
1 दिवाळीनिमित्त वसई-विरारमधील बाजारपेठा सजल्या
2 सहा महिन्यांत कुपोषणाचे ३४९ बळी
3 डहाणूतील गावपाडे संपर्क कक्षेबाहेर
Just Now!
X