अंबरनाथ : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना तिकीट विचारल्याने वांद्रे आणि किंग्ज सर्कल स्थानकावर प्रवाशांनी तिकीट तपासनीसांना रुळावर ढकलल्याची घटना ताजी असतानाच अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाने वरिष्ठ तिकीटतपासनीस महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मीनल धुळे हिला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली तर तिच्या पतीला विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दंड आकारून सोडून देण्यात आले.

अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून एक कुटुंब प्रवास करीत होते. या कुटुंबाला वरिष्ठ तिकीटतपासनीस नम्रता शेडगे यांनी तिकिटाची विचारणा केली. त्या वेळेस त्यांच्याकडे तिकीट नसल्याचे कळताच त्यांनी कुटुंबाला अंबरनाथ रेल्वे स्थानकात उतरविले. यामुळे संतापलेल्या त्या कुटुंबातील मीनल धुळे हिने तिकीटतपासनीस शेडगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि त्यानंतर मीनल धुळे हिला ताब्यात घेतले. नाताळच्या सुट्टीनिमित्त बुधवारी रेल्वे न्यायालय बंद असल्याने मीनल हिला पोलीस कोठडीत ठेवून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचेही शार्दूल यांनी स्पष्ट केले.