|| चेतना कारेकर

ठाणे ते बदलापूरदरम्यानच्या स्थानकांतील चित्र; स्वच्छतागृहांची योग्य देखभाल करण्याची आश्वासने वाऱ्यावर

ठाणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक पटकावण्यासाठी सर्व सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची लगबग सुरू असली तरी मध्य रेल्वेला मात्र, त्याच्याशी देणेघेणे नसावे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते बदलापूर स्थानकांमधील महिला प्रसाधनगृहांची दुरवस्था पाहिली की याचा अंदाज येतो.

नियमित सफाई न झाल्याने निर्माण झालेली दुर्गंधी, वीजबत्ती आणि पाणीपुरवठय़ाचा अभाव, साठून राहिलेला कचरा आणि बाहेर मुक्तपणे वाहणारे सांडपाणी अशी या स्थानकांतील प्रसाधनगृहांची अवस्था आहे. विशेष म्हणजे या प्रसाधनगृहांवर स्वच्छ भारत अभियानाचे पोस्टर मात्र झळकत आहेत. दरवर्षी स्वच्छ रेल्वे अभियानाअंतर्गत मध्य रेल्वे प्रशासन महिला प्रसाधनगृहांवर मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च केरते. तरीही या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारलेला नाही.

मध्यंतरी रेल्वे प्रवाशांनी केलेल्या आंदोलनादरम्यान महिला प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेचा मुद्दाही मांडण्यात आला होता. तेव्हा या स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे विशेष लक्ष पुरवण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, ते आश्वासन हवेत विरले आहे.

गेल्या वर्षी दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रसाधनगृहांची संख्या अपुरी असल्याने एका महिलेला रेल्वे रुळांवर नैसर्गिक विधीसाठी जावे लागले होते. यावेळी महिलेला गाडीचा धक्का लागल्याने या महिलेला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने स्थानकांच्या प्रसाधनगृहांची पाहणी केली होती. मात्र, काही दिवस केवळ कागदी घोडे नाचवत जुन्या प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि नव्या प्रसाधनगृहांची बांधणी, अशी काही आश्वासने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र ती सर्व आश्वासने फोल ठरली आहेत.

प्रसाधनगृहांची अवस्था

  • ठाणे रेल्वे स्थानकात महिलांसाठी तीन प्रसाधनगृहे आहेत. या तिन्ही प्रसाधनगृहांचा वापर करण्यासाठी पाच रुपये आकारले जातात. मात्र, या प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता आणि  दुर्गंधी आहे.
  •  दिवा रेल्वे स्थानकात महिलांसाठी एकच  प्रसाधनगृह असून तेथेही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते.
  •  डोंबिवली रेल्वे स्थानकाला स्वच्छ स्थानकांच्या यादीत सहाव्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले होते. प्रत्यक्षात या स्थानकातील प्रसाधनगृहांमध्ये घाण पसरली असून येथे विजेची सोयही नाही.
  • कल्याण रेल्वे स्थानकात एकूण आठ  प्रसाधनगृहे असून त्या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या  प्रसाधनगृहांमध्ये कचरापेटय़ांची संख्या अपुरी  आहे.
  •   अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही स्थानकांमध्ये प्रत्येकी केवळ एकच  प्रसाधनगृह असून गेले कित्येक दिवस या प्रसाधनगृहांची स्वच्छताही केली गेलेली नाही.

रेल्वे स्थानकातील स्वच्छतेवर नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते. तसेच काही रेल्वे स्थानकांत खाजगी कंत्राटदारांकडून स्वच्छता केली जात आहे. स्वच्छतेसाठी गर्दीच्या स्थानकांवर स्थानक संचालकांची नियुक्ती केले जात असून त्यांच्याकडून पाहणी केली जाते. जर ठाणे ते बदलापूर स्थानकांतील प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता अढळल्यास त्याची दखल घेतली जाईल. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे