11 July 2020

News Flash

नऊवारीला शाही मस्तानी, पेशवाई, मयूरपंखी शिवण

नवनवीन पद्धतीने साडी शिवून घेण्याकडे महिलांचा कल

नवनवीन पद्धतीने साडी शिवून घेण्याकडे महिलांचा कल

ठाणे : मराठमोळे लग्न म्हटलं की नऊवारी ओघाने आलीच. लग्नातील पारंपरिक विधीदरम्यान नऊवारी नेसण्यालाच महिला पसंती देतात. मात्र, हा ट्रेंड आता थोडासा बदलत चालला असून पारंपरिक नऊवारीऐवजी नवनवीन पद्धतीने नऊवारी शिवून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. ब्राह्मणी, पेशवाई, मयूरपंखी, शाही मस्तानी, देवसेना आणि जिजाऊ अशा प्रकारची शिवण करून नऊवारीचा दिमाख आणखी वाढवण्यात येत आहे.

लग्नसराई म्हणजे नटणे, सजणे हे आलेच, परंतु, या काळात ट्रेंडला जास्त प्राधान्य देण्यात येते. लग्नात पारंपरिक संकल्पनेसाठी वधू नऊवारी साडीला पसंती देत असते. बाजारात नवनवीन नऊवारी साडय़ा उपलब्ध असतात, परंतु ती साडी नेसणे महिलांना शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून ती साडी शिवून घेण्यास महिला प्राधान्य देतात. यंदाच्या वर्षी लग्नसराईत वधूंसाठी नऊवारी साडय़ांमध्ये विविध प्रकार आले असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी ब्राह्मणी, पेशवाई आणि मस्तानी या प्रकारच्या नऊवारी साडय़ा शिवून घेण्यास महिलांची पसंती होती. मात्र, यंदाच्या वर्षी नऊवारी साडय़ा शिवून घेण्यासाठी आणखी नवीन प्रकार आले असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामध्ये शाही मस्तानी, मयूरपंखी, गजरा, देवसेना, जिजाऊ, मदारसा हे साडय़ांचे नवीन प्रकार शिवून घेण्याकडे सध्या महिलांचा कल मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.

शाही मस्तानी या नऊवारी साडीची शिलाई ८०० ते १२०० रुपये आहे. तर, मयूरपंखी या साडीच्या निऱ्या आकर्षक पद्धतीने लावण्यात येतात, त्यामुळे ही साडी अनेकांना आकर्षित करत असते. या साडीची शिलाई १ हजार ते १६०० रुपये आहे. गजरा ही नऊवारी साडी १ हजार ते १४०० रुपयेपर्यंत शिवून मिळते.

देवसेना ही नऊवारी साडीची शिलाई ७०० ते १२०० रुपये इतकी आहे. जिजाऊ ही साडी ५०० ते ६०० रुपयांत शिवून मिळत आहे. मदारसा साडी ही दाक्षिणात्य लग्न परंपरेमध्ये परिधान केलेली आढळून येते. या साडीच्या शिलाईची किंमत ६०० ते ९०० रुपये आहे.

बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साडय़ा शिवून घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. या नऊवारी साडय़ांमध्ये विविध नवीन प्रकार आले असून यामध्ये शाही मस्तानी आणि मयूरपंखी या प्रकारांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

– लीना उपाध्ये,  नऊवारी साडी शिलाई व्यावसायिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2019 4:06 am

Web Title: women trend to sewing sarees in a new way zws 70
Next Stories
1 मैदानाच्या भूखंडावर हॉटेलचे बांधकाम
2 हत्येप्रकरणी पुतण्यासह पाच अटकेत
3 बॉलीवूड पार्कचे काम थांबवा
Just Now!
X