विश्रांतिगृहांना अत्यल्प प्रतिसाद; जनजागृतीचा अभाव

गर्दीच्या ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह उपलब्ध व्हावेत, तिथे त्यांना तात्पुरती विश्रांती घेता यावी किंवा स्तनदा मातांच्या सोयीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरात अशी विश्रांती कक्ष ठाणे महापालिकेकडून उभारण्यात आली आहेत. मात्र अपुऱ्या माहितीमुळे त्यांचा फारसा वापरच होत नसल्याचे आढळून आले आहे. शहरातील तीन हात नाका, आनंदनगर टोल नाका, गावदेवी या ठिकाणी ही स्वच्छता आणि विश्रांतिगृह उभारली आहेत. मात्र त्याला महिलांचा म्हणावा तितका प्रतिसाद नाही.

सन्मानाने जगण्याच्या दृष्टीने सर्वत्र स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये उपलब्ध असणे हा महिलांचा हक्क आहे आणि ते पुरवणे हे राज्य सरकार व महापालिकांचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना रस्त्यांलगत शौचालये उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिलांसाठी आधुनिक पद्धतीचे प्रसाधनगृह, चेंजिंग व फीडिंग रूम, सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, सॅनेटरी नॅपकिन इन्सेनेटर अशा सुविधा या महिलांच्या स्वच्छतागृहात दिल्या गेल्या. प्रायोगिक तत्त्वावर आणि पुढे संपूर्ण शहरभर ही योजना पोहचवण्याचा ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा मानस असला तरी सध्या सुरू असलेल्या केंद्रांमध्ये महिलांची अत्यल्प वर्दळ असल्याचे दिसून येते.

शहराच्या वेशीवर म्हणजेच आनंदनगर टोलनाक्यावर उभारण्यात आलेल्या विश्रांतिगृहाकडे गेल्या महिन्याभरापासून एकही महिला फिरकली नसल्याचे येथील स्थानिक सांगतात. तर गावदेवी हे शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण तसेच ठाणे रेल्वे स्थानकाचा परिसर असल्यामुळे गावदेवी मैदानालगत उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये दिवसाला दहा ते बारा महिलाच येत असतात. लाखोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या स्थानक परिसरातील महिलांना या कक्षाची पुरेशी माहिती करून देण्याची गरज आहे.