23 August 2019

News Flash

International Women’s Day 2018 झगमगत्या शहरात भयाच्या काळोख्या वाटा

वाढत्या लोकवस्ती आणि बदलत्या जीवनशैलीशी अनुरूप अनेक गोष्टी या शहरात उदयाला येऊ लागल्या आहेत.

ठाण्यातील अनेक भागांत महिलांना एकटय़ाने वावरणे असुरक्षित

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नेहमी राबता असल्याने सुसंस्कृतांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहराला आता ‘कॉपरेरेट’ रूपही लाभू लागले आहे. वाढत्या लोकवस्ती आणि बदलत्या जीवनशैलीशी अनुरूप अनेक गोष्टी या शहरात उदयाला येऊ लागल्या आहेत. त्यामुळे हे शहर २४ तास झगमगताना दिसते. असे असले तरी, आजही ठाण्यातील अनेक भाग महिलांसाठी असुरक्षित ठरत आहेत. ब्रह्मांड, कापूरबावडी, घोडबंदरचा काही भाग, वागळे इस्टेट, इंदिरानगर या भागांत एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलेला भुरटे चोर, विकृत नजरेने पाहणारी टोळकी, मद्यपी, गर्दुल्ले, छेडछाड करणारी तरुण मंडळी यांना सामोरे जावे लागत आहे.

ठाणे शहर आता घोडबंदरच्या टोकापर्यंत विस्तारले असून शहराच्या कानाकोपऱ्यांतून नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणी कामानिमित्त प्रवास करत असतात. मात्र, सायंकाळनंतर अनेक भागांतून जाणे त्यांच्यासाठी जिकिरीचे ठरत आहे. नव्या ठाण्यात अनेक गृहसंकुले उभी राहिली असली तरी या ठिकाणी जाणाऱ्या टीएमटीच्या बस फार तुरळक आहेत. या बसचे विशिष्ट वेळ नसल्याने ताटकळत उभे राहण्यापेक्षा येथील महिला, तरुणी रिक्षाचा आधार घेतात. मात्र गेल्या काही वर्षांत रिक्षात झालेल्या विनयभंगाच्या घटनामुळे या रिक्षातून लांब पल्ल्यावर रात्री उशिरा प्रवास करणे धोक्याचे वाटत असल्याचे स्नेहल भोसले यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

वागळे इस्टेट, इंदिरानगर हा परिसरही मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर असल्याने या परिसरातही दहशत जाणवते. मुळात हा परिसर झोपडपट्टय़ांनी व्यापलेला असून रात्री उशिरा मद्यपान करून रस्त्यावर धिंगाणा करणे, नाक्यानाक्यावर मद्यप्राशन करून घोळक्यांनी उभे राहणे, गर्दुल्ल्यांचा वावर यामुळे रात्री या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त होत, असे या परिसरात राहणाऱ्या प्रियांका गावडे यांनी दिली.

  • मानपाडा रस्ता : दिवसभर रहदारीचा असलेल्या या रस्त्यावर संध्याकाळी सातनंतर गर्दुल्ले आणि मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे रात्री उशिरा या रस्त्यावरून प्रवास करताना महिलांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याच रस्त्यावरून डावीकडे वळल्यावर हा रस्ता थेट टिकुजिनी वाडी रस्ता म्हणून ओळखला जातो. साधरणत: सायंकाळनंतर मानपाडय़ाला उतरून या रस्त्याने चालत जाणे महिला टाळत असल्याचे रुद्राणी चिटणीस या विद्यार्थिनीने सांगितले.
  • टिकुजिनी वाडी रस्ता : टिकुजिनी वाडी रस्त्याच्या चौकातून उजव्या हाताला वळल्यानंतर हा रस्ता कॉसमॉस लाँज, नीलकंठसारख्या मोठय़ा इमारती आहेत. या परिसरात राहणाऱ्या महिला आयटी, माध्यम अशा क्षेत्रांत कार्यरत आहेत. घरी परतण्यासाठी उशीर होत असल्याने रात्री आपला जीव मुठीत धरूनच आपले घर गाठावे लागते.
  • खेवरा सर्कल : खेवरा सर्कल मार्गावर डीमार्टसारखे मोठे रिटेल दुकान आहे. मात्र रात्री नऊनंतर येथील गर्दी ओसरते. हा रस्ता पुढे गुलमोहोरसारख्या मोठय़ा सोसायटय़ांकडे जातो. मात्र डी मार्टचा भाग सोडल्यास सायंकाळी सातनंतर हा रस्ता निर्जन असतो, असे इथे राहणाऱ्या अर्चना देसाई यांनी सांगितले. ढोकाळी, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मागचा रस्ता, साकेत मैदानाकडून पुढे जाणारा मार्ग, बाळकुम दादलानी पार्कचा भाग हे रस्तेही निर्जन म्हणूनच ओळखले जातात. घोडबंदरवरील दोस्ती इम्पेरियाच्या येथून आतल्या रस्त्यावर अ‍ॅक्मेओझोन, म्हाडाची वसाहत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना कुणीतरी सोबत असणे आवश्यक असते, अशी प्रतिक्रिया येथील एका स्थानिक महिलेने दिली.
  • हिरांनदानी मेडोज परिसर: खेवरा सर्कलच्या डाव्या बाजूला हिरानंदानी मेडोजकडेजाण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावर इडनवूडसारख्या उच्चभ्रू वस्ती आहेत. मात्र खेवरा सर्कल ते इडनवूड येईपर्यंत मधला भाग मोकळा असल्याने या रस्त्यावरून चालत जाणेही धोकादायक आहे.
  • वसंतविहार : वसंतविहार हा परिसर गजबजलेला परिसर मानला जातो, मात्र वसंतविहारच्या नाक्यावरून आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या इमारती आहेत. या रस्त्यावरून सायंकाळी जाताना शांतताच जाणवते. एकटय़ा महिलेने या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. पवार नगरकडे जाणारा रस्तादेखील रात्री नऊनंतर निर्जन असल्याचे दिसून येते.

First Published on March 8, 2018 3:47 am

Web Title: womens day 2018 womens safety issue in thane